Shravani Nandurdikar SSC Result 
नाशिक

Shravani Nandurdikar SSC Result | वर्तमानपत्र विक्रीच्या संघर्षातून तिने साकारले यशाचे स्वप्न

Shravani Nandurdikar SSC Result | श्रावणी नांदुर्डीकरची 100 टक्के गुणांची प्रेरणादायी झेप

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द, परिश्रम आणि स्वप्नांवरचा विश्वास कायम असेल तर यशाची शिखरे गाठता येतात, याचे प्रेरणादायी उदाहरण म्हणजे म्हसरूळ परिसरातील श्रावणी महेश नांदुर्डीकर. अत्यंत कष्टमय परिस्थितीत वाढलेल्या श्रावणीने दहावीच्या परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत अभूतपूर्व यश संपादन केले आहे. तिच्या या यशामुळे सर्व स्तरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

श्रावणीचे वडील महेश नांदुर्डीकर गेली तब्बल ३५ वर्षे वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय करत आहेत. वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय हा केवळ पेपर वाटण्यापुरता मर्यादित नसून तो अत्यंत कष्टमय आणि खडतर आहे. पहाटे ३ वाजताच दिवसाची सुरुवात होते. सर्वप्रथम वृत्तपत्रांचे गड्ढे घेणे, त्यांची विभागनिहाय छाननी करणे आणि त्यानंतर ऊन, वारा, पाऊस यांची पर्वा न करता घरोघरी वर्तमानपत्र पोहोचविण्याची धावपळ सुरू होते.

हा अविरत सुरू राहणारा व्यवसाय म्हणजे संघर्षाचे जिवंत उदाहरणच मानले जाते. या व्यवसायावरच नांदुर्डीकर कुटुंबाची उपजीविका अवलंबून आहे. कुटुंबाच्या संघर्षमय प्रवासात श्रावणीनेही लहानपणापासून वडिलांना हातभार लावला. पहाटे ५ वाजता उठून ती वडिलांसोबत वर्तमानपत्र वाटपासाठी जात असे. अनेकदा अभ्यास आणि जबाबदारी यांचा ताळमेळ साधताना तिला प्रचंड मेहनत घ्यावी लागली. मात्र परिस्थितीसमोर न झुकता तिने शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य दिले.

मेरी इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी असलेल्या श्रावणीने प्रत्येक इयत्तेत ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवत सातत्य टिकवून ठेवले. 'जर ९० टक्के गुण मिळू शकतात, तर शंभर टक्के का नाही?' या विचाराने प्रेरित होऊन तिने स्वतःला अभ्यासात पूर्णपणे झोकून दिले. सुरुवातीला चार ते पाच तास नियमित अभ्यास करणाऱ्या श्रावणीने परीक्षा काळात तब्बल १३ तास अभ्यास केला.

मोबाइल आणि इतर आकर्षणांपासून दूर राहत तिने स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित केले. अभ्यासासोबतच श्रावणी कला क्षेत्रातही उजवी ठरली आहे. भरतनाट्यमच्या चार परीक्षा उत्तीर्ण करत तिने नृत्यकलेत प्रावीण्य मिळवले आहे. नाटक आणि वक्तृत्व कलेतही ती पारंगत असून, विविध स्पर्धांमध्ये तिने उल्लेखनीय यश मिळवले आहे.

अभ्यास, कला आणि कुटुंबीयांची जबाबदारी यांचा सुंदर समतोल साधत तिने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. संघर्षाच्या अंधारातून मेहनतीचा दिवा पेटवत श्रावणीने मिळवलेले हे यश आज अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणेचा दीपस्तंभ ठरत आहे. भविष्यात विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन अभियंता होण्याचे तिचे स्वप्न आहे.

या यशामागे वडील महेश नांदुर्डीकर, आई तृप्ती नांदुर्डीकर यांचे कष्ट, त्याग आणि पाठबळ मोलाचे ठरले. तसेच मेरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका वर्षा कराड-खेडकर आणि वर्गशिक्षिका कुमोदिनी नारखेडे यांचे मार्गदर्शनही तिला लाभले.

आम्ही अतिशय कष्टमय परिस्थितीमध्ये व्यवसाय करीत आहोत. त्यामध्ये श्रावणी आम्हाला सुरुवातीपासूनच मदत करते आमच्यासाठी आज हा सुवर्णक्षण आहे.
- महेश नांदुर्डीकर, वृत्तपत्र विक्रेता

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT