नाशिक : आर्थिक अडचणीत सापडलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने पालकत्व स्वीकारण्याची मागणी काही अंशी राज्य शासनाने मान्य केली आहे.
राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांची संस्थात्मक सल्लागार म्हणून निवड केली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ही नाशिक जिल्हा बँकेचे संस्थात्मक सल्लागार म्हणून काम पाहील, असे पत्र सहकार विभागाने काढले आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
जिल्हा बँकेचे तब्बल २३०० कोटी रुपये कर्ज थकीत असून, ही वसुली थकल्याने बँकही आर्थिक अडचणीत सापडली आहे. ३१ मार्च २०२५ अखेर संचित तोटा ८५८ कोटी रुपये झाला आहे. बँकेने वसुलीसाठी आक्रमक पवित्रा घेतला असताना प्रशासक अनास्कर यांनी जिल्हा बँकेत थकबाकीदार शेतकऱ्यांशी संवाद साधत वसुलीबाबत मार्ग काढला. परंतु, त्यानंतर मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या झालेल्या बैठकीत वसुलीला ब्रेक लागला.
यातच प्रतापसिंह चव्हाण यांनी राजीनामा देऊन बँकेतून काढता पाय घेतला. त्यानंतर विभागीय सहनिबंधक संतोष बिडवई यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली. नागपूरच्या धर्तीवर नाशिक जिल्हा बँकेचेही पालकत्व राज्य बँकेने घ्यावे, ही मागणी कर्मचारीवर्गासह पतसंस्था, ठेवीदार व लोकप्रतिनिधींकडून झाली होती. मात्र, एकावेळी एकाच बँकेचे पालकत्व स्वीकारता येते, अशी अडचण सांगितली जात होती. अखेर त्यावर तोडगा काढत, संस्थात्मक सल्लागार म्हणून राज्य बँकेकडे नाशिक जिल्हा बँकेची जबाबदारी देण्यात आली आहे.
संस्थात्मक सल्लागार म्हणून अनास्कर यांची नियुक्ती झाली आहे. ते नागपूर जिल्हा बँकेचे संस्थात्मक प्रशासक म्हणून कामकाज पाहत आहेत. त्यात नाशिक जिल्हा बँकेचीही धुरा त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली २३ एप्रिलला झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला होता. बँकेचे व्यवस्थापन आणि प्रशासक बिडवई यांना कामकाज करताना मार्गदर्शन, तसेच बँकेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी उपाययोजना सुचविण्याचे काम अनास्कर करणार आहेत. बँकेला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतील, त्याही ते सुचविणार आहेत.
जिल्हा बँकेच्या सक्षमीकरणासाठी विविध उपाययोजना करणे व बँकिंग व्यवहारात सर्व प्रकारचे मार्गदर्शन करण्याची मोठी जबाबदारी राज्य सहकारी बँकेने स्वीकारली आहे. महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रातील हाही एक अभिनव प्रयोग आहे. या अंतर्गत राज्य सहकारी बँकेकडे उपलब्ध असलेली साधनसामग्री व मनुष्यबळ याचा उपयोग करून पुढील दोन वर्षांत नाशिक जिल्हा बँकेला सक्षम करण्याचा राज्य सहकारी बँकेचा प्रयत्न राहील.विद्याधर अनास्कर, प्रशासक, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक