नाशिक : येथील महात्मा गांधी रोडवर बुधवारी चालकासह दुचाकीला टोइंग व्हॅनमध्ये टाकण्याच्या प्रयत्नातील कर्मचारी व वाहतूक पोलिस.  (छाया : हेमंत घोरपडे)
नाशिक

Nashik News | अजबच : चालकासह दुचाकी ‘टोइंग’, कारवाईचा अतिरेक

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : वाहतुकीस शिस्त लागावी, यासाठी वाहतूक पोलिसांकडून शहरात टोइंग कारवाई सुरू करण्यात आली. मात्र या टोइंग व्हॅनवरील वाहतूक कर्मचारी व कंत्राटदाराकडील कर्मचारी नियमांना पायदळी तुडवत कारवाई करीत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. कारवाईवेळी वाहनचालक आल्यास वाहनावर टोइंग कारवाई न करण्याच्या सूचना असतानाही टोइंग व्हॅनवरील कर्मचारी दुचाकीवर बसलेल्या चालकासह वाहने उचलत ‘कर्तव्य’ बजावत असल्याचे समोर आले आहे.

बेशिस्त वाहनचालकांमुळे वाहतूक कोंडीची समस्या उद्भवते. त्यामुळे बेशिस्तरीत्या वाहने उभी करणार्‍या वाहनांवर टोइंग कारवाईचा निर्णय शहर पोलिसांनी घेतला. त्यासाठी अटी-शर्तींच्या अधीन राहून ठेकेदारास कार्यादेश दिला गेला. वाहनांवर टोइंग कारवाई करण्याआधी तेथे पूर्वकल्पना देणे बंधनकारक आहे. तसेच वाहने टोइंग केल्यानंतर वाहनचालकास नो पार्किंगसह टोइंगचा दंड भरावा लागतो. टोइंग कारवाई करताना वाहनचालक तेथे आल्यास त्याच्यावर फक्त नो पार्किंगमध्ये वाहन उभे केल्याबद्दल दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश आहेत. मात्र या आदेशांना वाहतूक पोलिस व टोइंग व्हॅनवरील खासगी कर्मचारी सर्रास दुर्लक्ष करीत आहेत. महात्मा गांधी रोडवर बुधवारी (दि. 4) दुपारच्या सुमारास नेहमीप्रमाणे टोइंग व्हॅनवरील कर्मचार्‍यांनी कारवाई केली. मात्र नो पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या वाहनचालकांनी वेळीच धाव घेतल्याने नियमाप्रमाणे त्यांना फक्त ‘नो पार्किंग’चा दंड आकारणे अपेक्षित होते. मात्र संबधितांनी तसे न करता वाहनांवर टोइंग कारवाईचा अट्टहास केला. त्यामुळे दुचाकीवर बसलेली महिला नाईलाजाने बाजूला झाली. त्यानंतर तिची दुचाकी टोइंग व्हॅनमध्ये जमा करण्यात आली. एका युवकाने दुचाकीवरून उतरण्यास नकार दिल्याने टोइंग ठेकेदाराकडील कर्मचार्‍यांनी दुचाकीस्वार युवकासह दुचाकी उचलली. मात्र बघ्यांची गर्दी वाढल्याने त्यांनी दुचाकीसह युवकास सोडून दिले, व त्याच्यावर ई-चलननुसार कारवाई केल्याचे समजते.

मात्र या घटनेने टोइंग कारवाईच्या नावाखाली वाहतूक पोलिस व टोइंग व्हॅनवरील कर्मचार्‍यांची दादागिरीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे वाहनचालकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

झाल्या प्रकाराबाबत माहिती घेण्यात येईल. संबंधित अंमलदार आणि टोइंग व्हॅनवरील कर्मचार्‍यांना नियमानुसारच कामकाजाच्या सूचना देऊ. पूर्वसूचना दिल्यानंतरच कारवाई केली जाते.
- - चंद्रकांत खांडवी, पोलिस उपआयुक्त, शहर वाहतूक

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT