नाशिक

Nashik News | जुन्या नाशकात आजी-माजी आमदारांमध्ये हमरीतुमरी

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- जुन्या नाशिकमधील भद्रकाली परिसरातील घासबाजार येथील मतदान केंद्राबाहेर भाजपच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते तथा माजी आमदार वसंत गिते यांच्यात जोरदार हमरीतुमरी झाली. यावेळी फरांदे यांच्या समर्थनार्थ महायुतीच्या कार्यकर्त्यांनी 'जय श्रीराम', 'नरेंद्र मोदी आगे बढो' च्या घोषणा दिल्या, तर गिते समर्थकांनीही प्रत्युत्तरादाखल घोषणाबाजी केल्याने परिसरात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात येऊ शकली.

नेमकं काय घडलं?

  • घासबाजार येथील मनपाच्या अब्दुल कलाम उर्दू शाळेत सकाळपासून शांततेत मतदानाला सुरुवात झाली होती. मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला.
  • सकाळी 11.30 च्या सुमारास फरांदे यांनी या मतदान केंद्रावर येत मतदारांकडील चिठ्ठ्या तपासण्यास सुरुवात केली. काही महिला मतदारांची ओळख तपासणीही त्यांनी करण्याचा प्रयत्न केला.
  • यावेळी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेत मतदान केंद्रात आमदार कशा असा सवाल केला. त्यामुळे वादाला सुरुवात झाली. त्यातून दोन्ही गट एकमेकांसमोर आले.

वसंत गिते, माजी महापौर विनायक पांडे यांनी आ. फरांदे यांच्या कृतीविरोधात संताप व्यक्त करत तीव्र शब्दांत प्रतिकार केला. यावेळी दोन्ही गटांतील समर्थकांनी आरडाओरड, घोषणाबाजी केल्यामुळे वाद वाढत असल्याचे बघून मतदारांनी मतदान केंद्रातून काढता पाय घेतला होता. त्यामुळे परिसरात तणाव वाढला होता. घटनेची माहिती मिळताच तेथील बंदोबस्तावरील भद्रकाली पोलिसांसह गुन्हे शाखा व सशस्त्र पोलिसांच्या पथकाने धाव घेत दोन्ही गटांमधील समर्थकांना दूर नेले.

पोलिसांनी केली मध्यस्ती

सहायक पोलिस आयुक्त सिद्धेश्वर धुमाळ, भद्रकाली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी मध्यस्थी करत गिते यांना बाजूला केले, तर आ. फरांदे यांनाही पोलिसांनी दुसऱ्या बाजूला नेत परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. या घटनेमुळे मतदान केंद्राबाहेर सुमारे तासभर तणाव होता. दोन्ही गटांना बाजूला नेल्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांना तंबी देत समज काढून माघारी पाठविले.

सोशल मीडियावर युद्ध भडकले

आजी-माजी आमदारांमध्ये झालेल्या या वादाचे पडसाद सोशल मीडियावरही उमटले. हिंदुत्ववादी संघटनांकडून आ. फरांदेंवर 'जिहादी हल्ला' झाल्याच्या पोस्ट व्हायरल केल्या गेल्या, तर आ. गिते जिहादी कसे, असा सवाल करत गिते समर्थकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर दिले गेले. या माध्यमातून काही समाजकंटकांनी शहरात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परंतु सुज्ञ मतदार आणि नागरिकांनी या घटनेकडे फारसे लक्ष न दिल्याने वादावर पडदा पडला.

हेही वाचा –

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT