नाशिक : प्राचीन काळातील गुरू - शिष्य परंपरा ही भारताची जगाला मोठी भेट होती. त्या काळातील शिक्षण सर्वार्थाने विश्वव्यापी होते म्हणूनच त्यांना विश्वविद्यालय म्हटले जाते. या शिक्षण पद्धतीतील फायदे लक्षात घेऊन गुरुकुल पद्धतीने दिले जाणारे देशातील पहिले आयुर्वेद वैद्यकशास्त्र शिक्षण केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालयातर्फे पुढील वर्षापासून नाशिकमध्ये सुरू होत आहे.
पुढील वर्षी सुरू होणारे अभ्यासक्रम
बीएड (इंटिग्रेटेड)- ४ वर्षे कालावधी
संस्कृत नवतंत्रज्ञान, वास्तुविशारद शिक्षणक्रम (आर्किटेक्चर).
भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाचा उपक्रम असलेल्या केंद्रीय संस्कृत विद्यापीठाची मुहूर्तमेढ २०२० मध्ये रोवली गेली. देशात दिल्ली, तिरुपती आणि नाशिकमध्ये तीन ठिकाणी संस्कृत विश्वविद्यालयांची उभारणी करण्यात आली. याच विद्यापीठात गुरुकुल शिक्षण पद्धतीचा आयुर्वेदाचा वैद्यक शिक्षणक्रम शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून सुरू होत आहे. सध्या मुंबई - आग्रा महामार्गावरील टाकेकर शिक्षण संकुलात संस्कृत विद्यापीठाचे अभ्यासक्रम सुरू केल्याची माहिती केंद्रीय संस्कृत विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. मदनमोहन झा यांनी दिली. त्यासाठी शिलापूर (ता. नाशिक) येथे संस्कृत विद्यापीठ येथे संस्कृतसंबंधी विविध शिक्षणक्रमांसह हा देशातील पहिल्या गुरुकुल आधारित आयुर्वेदिक शिक्षणक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. त्यासाठी पुढील शैक्षणिक वर्षापासून सुरू होणाऱ्या या शिक्षणक्रमासाठी विद्यापीठातर्फे स्वतंत्र प्रवेश प्रक्रिया घेण्यात येणार आहे.
केंद्रीय संस्कृत विदयापीठ, नाशिक केंद्रातर्फे संस्कृत आणि विज्ञानासह अकरावी - बारावी आणि पदवीचे चार तसेच पदव्युत्तर एमए 'हिंदू स्टडीज्' आणि संस्कृत असे पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. त्यामध्ये सुमारे १६० विद्यार्थ्यांंचे प्रवेश निश्चित केले आहेत. वेद कर्मकांड ज्योतिष संस्कृत साहित्य व व्याकरण या अभ्यासक्रमांतून विद्यार्थी पदवी पूर्ण करू शकणार आहेत. संस्कृत भाषेसह जगातील ग्रीकसारखी एखादी प्राचीन भाषाही बीए (साहित्य) शिक्षणक्रमात विद्यार्थ्यांना शिकवली जाणार आहे. विद्यार्थ्यांसाठी खास बीए (संस्कृत) सह नागरी प्रशासकीय सेवा शिक्षणक्रमही त्यामध्ये महत्त्वपूर्ण ठरणार आहे.