नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्यस्तरीय पोलिस क्रीडा स्पर्धांना रविवारी (दि. ४) सुरुवात होत आहे. या स्पर्धेत राज्यभरातून ३ हजार ५०० महिला-पुरुष पोलिस खेळाडू सहभागी झाले आहेत. १९ मैदानांवर होणाऱ्या या स्पर्धांचे संयोजन शहर पोलिस करीत आहेत.
डिसेंबर महिन्यात विभागीय पोलिस क्रीडा स्पर्धा झाल्या. त्यानंतर राज्यस्तरीय पोलिस क्रीडा स्पर्धांचे आयोजन नाशिकमध्ये करण्यात आले आहे. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली आयुक्तालयातर्फे राज्यस्तरीय पोलिस क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले आहे. या स्पर्धांसाठी राज्यभरातील सुमारे साडेतीन हजार पोलिस खेळाडू शहरात दाखल झाले आहेत. त्र्यंबकरोडवरील महाराष्ट्र पोलिस अकादमीच्या १९ मैदानांवर या स्पर्धा होणार आहेत, तर नाशिकरोड येथील आंतरराष्ट्रीय जलतरण तलावात जलतरण स्पर्धा होणार आहेत. स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन गुरुवारी (दि. ८) महाराष्ट्र पोलिस दलाच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या उपस्थितीत होणार आहे. स्पर्धेचा समारोप शनिवारी (दि. १०) उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे. या स्पर्धेसाठी राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
स्पर्धेचे नियोजन
स्पर्धेत ९६० महिला व २ हजार ५४० पुरुष खेळाडूंचा सहभाग आहे. महाराष्ट्र पोलिस अकादमीतील १९ मैदानांवर स्पर्धा होणार आहेत. स्पर्धेत ७ पुरुष संघ व ४ महिला संघ सहभागी होत आहेत.