पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहरात निर्माण होणार्या विघटनशील आणि अविघटनशील कचर्यापासून महापालिका लवकरच जैविक इंधनाचा नवीन पर्याय असलेल्या हायड्रोजन वायूची निर्मिती करणार आहे. पहिल्या टप्प्यात 10 टन क्षमतेचा प्रकल्प सुरू करण्यात येणार असून, याबाबत रामटेकडी येथे चाचपणी केली जात आहे. केंद्र आणि राज्य शासनाकडून भविष्यातील इंधन म्हणून हायड्रोजननिर्मितीसाठी धोरणे जाहीर करण्यात आली आहेत. त्यानुसार महापालिका प्रायोगिक तत्त्वावर रामटेकडी येथे दैनंदिन 10 टन कचर्यावर प्रक्रिया करून 0.6 टन हायड्रोजननिर्मितीचा प्रकल्प उभारणार आहे.
या प्रकल्पात होणारी हायड्रोजननिर्मिती तसेच प्रकल्पाचे आर्थिक स्थैर्य लक्षात घेऊन 350 टन क्षमतेच्या प्रकल्पास मान्यता देण्यात येणार आहे. यासंदर्भात नुकतीच महापालिकेत अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणार खेमनार यांच्या उपस्थित बैठक झाली. या प्रकल्पास येणारा खर्च तसेच अनुदानाबाबत निर्णय होत नसल्याने हा प्रकल्प रेंगाळला होता. मात्र, पालिकेने पुढाकार घेत या प्रकल्पास गती दिली आहे. वेरियट पुणे वेस्ट टू एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड आणि द ग्रीन बिलियन्स लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून रामटेकडी येथील महापालिकेच्या जागेत हा प्रकल्प उभारला जाणार आहे.
रामटेकडी येथील प्रकल्पात तयार होणारा हायड्रोजन पीएमपीसाठी दिला जाणार आहे. एआरएआयकडून पीएमपी बसेससाठी हायड्रोजन वापरासाठीचे तंत्रद्यान उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्याच्या वापराने इंधनाची किती बचत होईल, खर्च कसा वाचेल, याची माहिती घेतली जाणार आहे. या माहितीच्या आधारावरच महापालिकेकडून दुसर्या टप्प्याच्या प्रकल्पास निधी तसेच अनुदान देण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचे डॉ. खेमनार यांनी सांगितले.
हेही वाचा