नाशिकच्या तीन जागांवर शरद पवार गटाचा दावा Pudhari File Photo
नाशिक

Nashik News | नाशिकच्या तीन जागांवर शरद पवार गटाचा दावा

वरिष्ठांना कळविण्यात येईल : जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : जिल्ह्यातील विद्यमान सहा जागांसह नाशिक मध्य, पश्चिम व पूर्व तसेच चांदवडच्या जागेवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने दावा सांगितला आहे. या जागांसाठी पक्ष आग्रही असून याबाबत वरिष्ठांना कळविण्यात येईल, असे पक्षाचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड यांनी सांगितले.

विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातर्फे बुधवारी (दि. ७) पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट केली. आगामी निवडणूकीत पक्षातर्फे विद्यमान सहाही जागांवर दावा सांगण्यात आला आहे. नाशिक शहरातील तीन्ही जागा व चांदवड मतदारसंघासाठी पक्ष आग्रही आहे. पक्षाला अधिकाधिक जागा मिळाव्यात अशी आग्रही भूमिका आहे. पण महाविकास आघाडी जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेही आव्हाड यांनी स्पष्ट केले.

सिन्नरला उदय सांगळे हे निवडणूक लढण्यासाठी इच्छूक आहे. महाविकास आघाडीत शरद पवार गटातून ते निवडणूकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे बोलले जात आहे. त्याअनुषंगाने बोलताना आव्हाड यांनी सांगळेंना निवडणुक लढवण्याचा पुर्ण अधिकार आहे. पण ते राष्ट्रवादीचे अधिकृत पदाधिकारी नाहीत. त्यामुळे प्रथमत: त्यांनी पक्षात अधिकृत प्रवेश करावा. आम्ही त्यांचे स्वागत करु, असेही ते म्हणाले. निवडणुकीच्या दृष्टीने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील १५ ही जागांची चाचपणी करण्यात आली आहे. यावेळी संभाव्य उमेदवारांच्या मुलाखती पूर्ण झाल्या आहेत, असे आव्हाड यांनी सांगितले. याप्रसंगी रामकृष्ण झाडे, संजय सोनवणे, संगिता पाटील, अॅड. तुषार जाधव, दीपक वाघ, निवृत्ती कापसे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

पश्चिममध्ये इच्छूक अधिक

राष्ट्रवादी पवार गटाकडून शहरातील तीनही जागांसाठी इच्छूकांची चाचपणी करण्यात आली आहे. नाशिक मध्यमध्ये शहराध्यक्ष गजानन शेलार इच्छुक आहेत. नाशिक पश्चिमला माजी आमदार नितीन भोसले, नाना महाले, बाळा निगळ, बाळासाहेब जाधव तर पूर्वमध्ये जगदीश गोडसे, सचिन पिंगळे, राजाराम मते इच्छुक आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT