महाराजस्व अभियान Pudhari
नाशिक

Nashik News | राज्यात 1 जूनपासून महसूल विभागाचे 'महाराजस्व अभियान'

शेतकरी, नागरिकांचे प्रलंबित प्रश्न निकाली काढणार, 31 जुलैपर्यंत आयोजन

पुढारी वृत्तसेवा

देवळाली कॅम्प (नाशिक) : राज्यातील शेतकरी, सर्वसामान्य नागरिक यांचे महसूल विभागाशी संबंधित प्रलंबित प्रश्न निकाली काढण्यासाठी 1 जून ते 31 जुलैदरम्यान 'महाराजस्व अभियान' राबविण्यात येणार आहे. महसूल विभागाचे सहसचिव डॉ. सत्यनारायण बजाज यांनी अध्यादेश जारी केला आहे.

शासनाच्या निर्णयानुसार एका महिन्याच्या आत प्रलंबित असलेले फेरफार निकाली काढणे, त्यासाठी मंडलनिहाय फेरफार अदालतीचे आयोजन करणे बंधनकारक केले आहे. तहसील, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी या स्तरावर एक ते तीन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीसाठी प्रलंबित असलेले फेरफार निकाली काढण्यात येणार आहेत. भूसंपादन केलेल्या अकृषिक परवानगी (एनए ऑर्डर) कमी जातपत्रके तयार करून गावदफ्तर अद्ययावत करणे, जमीन महसूल संहिता 1966 च्या कलम 42 (ब), 42 (क), आणि 42 (ड ) नुसार समाविष्ट होणाऱ्या जमिनींच्या भोगवटादारांकडून अकृषिक रक्कम आकारणीची रक्कम भरून घेणे आणि त्या अनुषंगाने संबंधितांना सनद देण्याची तरतूद केली आहे. त्यानुसार सर्व मिळकतधारकांना अकृषिक आकारणी मागणीची नोटीस देणे, त्याची तातडीने कारवाई करावी. गाव नकाशाप्रमाणे अतिक्रमित व बंद केलेले गाडीरस्ते, पाणंद, शेतरस्ते, शिवाररस्ते, शेतावर जाण्याचे मार्ग मोकळे करणे तसेच वहिवाटिचे रस्ते मोकळे करणे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा लाभ होण्यास मदत होणार आहे. ही मोहीम सर्व जिल्ह्यांत राबविण्यात येणार आहे.

अभियानात गाव तिथे स्मशानभूमी, दफनभूमी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत कार्यवाही करणे, लोकसेवा हक्क अधिनियम 2016 ची प्रभावी अंमलबजावणी करणे, शैक्षणिक प्रयोजनासाठीचे दाखले नागरिकांना उपलब्ध करून देणे, त्यासाठी गावपातळीवर शिबिरे घेणे, वाजिब-उल-अर्जच्या नोंदी अद्ययावत करणे, मोजणी प्रकरणे निकाली काढणे, ई-पीक पाहणी प्रकल्पाची अंमबजावणी सर्व स्तरावर करावी, औद्योगिक कंपन्यांना प्रयोजनाकरिता संपादित जमिनींच्या विक्री/वापर बदलाबाबतची सद्य:स्थिती तपासणे, वाळूसाठा कार्यपद्धती निश्चित करणे, गौणखनिज ऑनलाइन प्रणालीची माहिती अद्ययावत करणे ही काम केली जाणार आहे.

सिंधी समाजासाठी विशेष अभय योजना

पोटहिस्सा, सामिलीकरण, भूसंपादन रस्ता, सेटबॅक या कारणांमुळे होणाऱ्या बदलामुळे दुरुस्तीसह अद्ययावत नकाशा करणे, अनुसूचित जमाती शेतकरी खातेदारांच्या शेतजमिनी, खातेफोड, पोटविभाजन करण्यासाठी मोहीम राबविणे, ई-हक्क, सलोखा योजना, जिवंत सातबारा यांची अंमलबजाणी करावी, सिंधी समाजासाठी विशेष अभय योजनेची अंमलबजावणी करणे यासह विविध योजना या महाराजस्व अभियानात राबविण्यात येणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT