नाशिक : शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावर आक्रमक झालेल्या प्रहार संघटनेने शुक्रवारी (दि.11) राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या दारात मशाल पेटवत ठिय्या आंदोलन केले.
कृषिमंत्री जागे व्हा.., शेतकऱ्यांना कर्जमाफी झालीच पाहिजे, घेतल्याशिवाय राहणार नाहीत, अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, सरकार सत्तेत येऊन 100 दिवस उलटूनही कर्जमाफी झाली नसल्याने आंदोलन करत असल्याचे कडू यांनी सांगितले..
महात्मा जोतिबा फुले जयंतीचे औचित्य साधत मुंबई नाका येथील महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करत कडू यांनी मोर्चाला सुरुवात केली. मोर्चा मायको सर्कलमार्गे कोकाटे यांच्या निवासस्थानी आला. येथे प्रवेशव्दारावर आंदोलकांनी ठिय्या मांडत घोषणाबाजी केली. मुख्यमंत्री आश्वासन विसले. शेतकऱ्यांचा सातबारा कधी कोरा करणार याची तारीख सांगा अशी मागणी केली. आंदोलनात दत्ता बोडके, अनिल भंडागे, शरद शिंदे, गणेश निंबाळकर, संध्या जाधव, रूपेश परदेशी, ललित पवार, चंद्रभान गांगुर्डे, शाम गोसावी, निवृत्ती धात्रक आदी सहभागी झाले होते.