अंबादास बेनुस्कर
पुढारी वृत्तसेवा : पिंपळनेर पोलिस ठाण्यात आगामी गणेशोत्सव,सुरक्षित आणि उत्साहात साजरा करावा यासाठी पिंपळनेर पोलिस ठाण्यात शांतता कमेटीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीत गणेश मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि डीजेमालकांची समन्वय बैठक पार पडली.उ पविभागिय पोलिस अधिकारी सुधीर पाटील यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या बैठकीत प्रशासनाने उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अनेक कडक नियम व मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या.
या बैठकीत आरोग्याला होणारा अपाय आणि जीवितास होणारा धोका टाळण्यासाठी पिंपळनेरसह ग्रामीण भागातही डीजे वाजविण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आल्याचे उपविभागिय अधिकारी सुधीर पाटील यांनी स्पष्ट केले.डीजे लावून मिरवणूक काढल्यास तो तात्काळ जप्त करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल,असा सज्जड दम प्रशासनाकडून देण्यात आला.मात्र नियम पाळून ठरवलेल्या ध्वनीमयदित बॅंड, ढोल-ताशे आणि इतर पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यास परवानगी असेल,विसर्जन मिरवणुकीसाठी केवळ नोंदणीकृत मंडळांनाच परवानगी दिली जाणार असून रात्री १२ पर्यंतची वेळ निश्चित करण्यात आली आहे.प्रत्येक मंडळासाठी एक स्वतंत्र पोलिस अंमलदार नियुक्त करून पोलिस प्रशासन आणि मंडळांमध्ये उत्तम समन्वय साधला जाईल.गणपती आगमनाच्या मिरवणुकीस औपचारिक परवानगी नसली तरी गणपती बाप्पा वाजत-गाजत घेऊन जाण्यास पूर्ण मुभा असेल,असेही नमूद करण्यात आले.
मंडळांकडून सहकार्याची अपेक्षा
प्रशासनाकडून मंडळांना मार्गदर्शन करताना प्रत्येक मंडळाने दहा दिवसांसाठी अधिकृत वीज जोडणी घ्यावी, मंडपांमुळे वाहतुकीला कोणताही अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी अशा सूचना दिल्या,तसेच गणपतीच्या सुरक्षेसाठी स्वयंसेवकांच्या वेळा निश्चित करून चोवीस तास सदस्य उपस्थित राहावेत. आक्षेपार्ह मजकूर, प्रक्षोभक देखावे किंवा धार्मिक भावना दुखावणारे बॅनर्स लागू नयेत, असे आवाहन पोलिस निरीक्षक नामदेव संसारे यांनी केले.गर्दीच्या वेळी चोऱ्या व अनुचित प्रकार टाळण्यासाठी मंडळाच्या स्वयंसेवकांनी पोलिसांना पूर्ण सहकार्य करावे,असे सांगण्यात आले.
या बैठकीत सपोनी नामदेव सहारे,उपनिरिक्षक संदीप संसारे,प्रसाद रौंदळ,गोपनिय विभागाचे शिरसाठ, नगराध्यक्षा योगिता चौरे,उपनगराध्यक्ष योगेश नेरकर,संभाजी अहिरराव,नायब तहसिलदार सुभाष गांगुर्डे,डॉ.जितेश चौरे,हाजी जुहुर जहागिरदार,हाजीजावेद सैय्यद,प्रकाश पाटील,सतिष पाटील,बाबा पेंढारकर,अंबादास बेनुस्कर,सुदाम पगारे,जगदीश ओझरकर,चंदन सूर्यवंशी,गौतम पवार,मोतिराम पोतदार,विज मंडळाचे पदाधिकारी, पिंपळनेर शहर व परिसरातील विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या बैठकीस उपस्थित होते.
विनाखंडित वीजपुरवठा करा
बैठकीत गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी काही प्रमुख मागण्या मांडल्या.यात मिरवणूक मार्गावरील खड्डे त्वरित बुजविणे, उत्सवाच्या दहाही दिवसांत विनाखंडित वीजपुरवठा ठेवणे आणि विसर्जन मार्गावर पुरेशी प्रकाशव्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली. तसेच उत्सव काळात चिकन मटण आणि दारूविक्री बंद ठेवावी आणि गणपती स्थापनेच्या ठिकाणापासून ५० मीटर परिसरातील मांसाहारी दुकाने बंद ठेवण्यात यावीत, अशी आग्रही मागणीही मंडळांनी केली.खराब रस्ते व वीजपुरवठ्याबाचत संबंधित विभागांना पोलिस ठाण्यामार्फत पत्रव्यवहार करण्यात येईल,असे पोलिसांनी आश्वासन दिले.