नाशिक : खिडकी नसलेली राज्य परिवहन महामंडळाची बस. 
नाशिक

Nashik News : अशी कशी बसची अवस्था प्रवाशांना झोंबतोय गारठा

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– विविध लोकप्रिय योजनांनी राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमधून प्रवाशांची गर्दी वाढत आहे. परंतु, त्या प्रमाणात सोयी – सुविधांचा विकास साधण्याकडे व्यवस्थापनाने पूर्णत: दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. भंगार झालेल्या बसेस, आयुर्मान संपुष्टात आले नसले तरी देखभाल – दुरुस्तीकडे कानाडोळा झालेल्या बसेसमधून आरामदायी प्रवास दिवास्वप्न ठरत आहे. आता हिवाळा सुरु झाला असून, तुटलेल्या व खिळखिळ्या झालेल्या खिडक्यांमुळे सकाळ व रात्रीच्या सत्रात प्रवास करणाऱ्यांना गारठा सहन करतच अंतर कापावे लागत आहे.

प्रवाशांच्या सेवेसाठी या ब्रीदप्रमाणे सेवा देताना राज्य परिवहन महामंडळाचा कस लागत आहे. तोट्यातील बसची चाके कोरोना लॅाकडाऊन त्यानंतरच्या कर्मचाऱ्यांचा संपानंतर अधिक खोलात रुतले. त्यातून उभारी देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ७५ वर्षांवरील प्रवाशांना माेफत प्रवास आणि महिलांना सरसकट ५० टक्के सवलत या याेजना लागू करत प्रवासीवाढ करण्यात यश मिळवले. योजनांच्या सवलतीचा शासन पेलत असले तरी बसेसने पूर्णत: कात टाकलेली नाही.

१० वर्षे आणि १५ लाख किलोमीटरहून अधिक प्रवास झालेल्या अनेक बसेस धावत आहेत. त्यातील प्रवासी सेवेचा दर्जा हा गोड मानून घ्या, अशा स्वरुपाची आहे. टायर गुळगुळीत झालेले, वर्कशॉपमधून सुरु केलेली बस फलाटावर लावण्यापर्यंत आणि ती मार्गस्थ होईपर्यंत सुरुच ठेवावी लागणे, दिवाबत्ती गुल, गियर बदलताना कर्णकर्कश आवाज होणे या समस्यांना चालक-वाहकच वैतागले आहेत. गर्दीच्या मार्गावर जागा मिळविण्याची स्पर्धा असते. तिथे ब्रेकडाऊनच्या वाढलेल्या प्रमाणाने प्रवाशांची कोंडी होते. मागून येणाऱ्या बसमध्ये जागा मिळेलच याची शाश्वती नसते. या समस्यांमध्ये खिळखिळ्या व तुटलेल्या खिडक्यांची भर पडली आहे. पावसाळ्यात गळती आणि हिवाळ्यात संपूर्ण बसमध्ये खेळत्या हवेमुळे गारठ्याचा त्रास प्रवाशांना असह्य होत आहे. बसच्या एका बाजुला किमान सहा खिडक्या असतात, त्यापैकी किमान एखादी तुटलेली खिडकी संपूर्ण बसमध्ये गारठा वाढविण्यास पुरेसी ठरते. शिवाय, बसने गती घेतल्यानंतर खिळखिळ्या खिडक्या वाजू लागतात, तो आवाज डोकेदुखी ठरतो. हिवाळ्याचा हंगाम पाहता किमान या दिवसांत सकाळ आणि रात्रीच्या सत्रात सुस्थितीतील बसेसच लांब पल्ल्यावर सोडण्यात याव्यात, अशी अपेक्षा प्रवाशी व्यक्त करत आहेत.

उत्पन्नवाढीने व्हावा कायापालट

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाने प्रवासी तिकीट दरात सरसकट १० टक्के वाढ केली होती. या भाडेवाढीचा काेणताही प्रतिकूल परिणाम झाला नाही. दि. ८ ते २९ नोव्हेंबर या कालावधीत सुमारे आठ कोटी चार लाख प्रवाशांनी महामंडळाच्या बसमधून प्रवास केला. त्यातून महामंडळाला तब्बल ६१५ कोटीचे लक्ष्मीदर्शन झाले. २०२२ च्या दिवाळीत सुमारे २२५ कोटीचं उत्पन्न मिळाले होते. त्यावरुन यंदाची घसघसीत वाढ लक्षात येते. महामंडळाच्या तिजोरीत जमा या महसुलामुळे तोट्याचा भार कमी होण्यास मदत झाली. हीच संधी साधून बसेसच्या दुरुस्तीबरोबर नवीन बसगाड्या सेवेत दाखल करण्याचा व्यवस्थापनाने विचार करावा, अशी मागणी होत आहे.

सटाणा – नाशिक – सटाणा मार्गावरील बसेसच्या स्थितीत सुधारणेची आवश्यकता आहे. खिडक्याच्या काचा तुटलेल्या अथवा खिडक्याच गायब आहेत. पावसाळ्यात पाणी आत येऊन आणि आता हिवाळ्यात वारा खेळता राहून प्रवाशांच्या सहनशिलतेची परीक्षा पाहतो. व्यवस्थापनाने बसेला किमान खिडक्या सुस्थितीत बसवाव्यात, त्यांना लॉकही लावावेत. अन्यथा त्या आपोआप सरकतात.

– जयेश सोनवणे, प्रवाशी

बसेसची तपासणी का नाही?

वाहतूक पोलिस तसेच आरटीओ विभागाची पथक मुख्य रस्ते, महामार्ग आणि महानगरात ठिकठिकाणी वाहनांची तपासणी करतात. या तपासणीत महामंडळाच्या बसेसला सूट असते का? आयुर्मान संपलेल्या, जुनाट बस पळवत प्रवाशांच्या जीवाशी खेळ तर होत नाही ना, याची 'आरटीओ'ने खातरजमा करावी, अशी मागणीही प्रवाशी करु लागले आहेत.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT