नाशिक

Nashik News : पाणंद रस्त्यांची कासवगतीने वाटचाल; मंजूर कामांची संंख्या १,४७५; अवघी ११४ कामे सुरू

गणेश सोनवणे

मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ते योजने अंतर्गत जिल्ह्यात एक हजार ४७५ कामांना मंजुरी देण्यात आली असली, तरी अद्याप १५ तालुके मिळून अवघी ११४ कामे सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. त्यातही सर्वाधिक कामे म्हणजे २८७ कामे नांदगाव तालुक्यात मंजूर आहेत. मात्र, सध्या या तालुक्यात एकही काम सुरू नसल्याची धक्कादायक माहिती अहवालातून समोर आली आहे. पालकमंत्री दादा भुसे यांच्या तालुक्यासाठी या योजने अंतर्गत २२२ कामे मंजूर होती. मात्र त्यातही अवघी सात कामे सुरू असल्याने पाणंदच्या रस्त्यांची जिल्ह्यात कासवगतीने वाटचाल होत असल्याचे समोर आले आहे.

ही योजना राबविण्याबाबत तालुका स्तरावर गटविकास अधिकारी निर्णय घेत असतात. दि. २४ नोव्हेंबरच्या अहवालानुसार जिल्ह्यात एक हजार ४७५ कामे मंजूर होती, त्यापैकी ३९३ कामांना तांत्रिक मान्यता आणि ३७४ कामांना प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे, तर ३७१ कामांना कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. मात्र प्रत्यक्षात अवघ्या ११४ कामांना सुरुवात झाली आहे.

राज्यातील शेत रस्ते हे अन्य महामार्गांएवढेच महत्त्वाचे असतात. शेतात पीक तयार होताच ते काढून योग्य ठिकाणी साठवले पाहिजे किंवा बाजारात विकले गेले पाहिजे. परंतु रस्ता नीट नसल्यामुळे शेतकऱ्यांना ते करणे शक्य होत नाही. पावसाळ्यात निघणारी पिके आर्थिकदृष्ट्या कितीही फायदेशीर असली, तरी रस्त्याअभावी ती विकण्याचा विचार शेतकऱ्यांना करता येत नाही. पाणंद रस्त्याची अनुपलब्धता हा यातील मोठा अडथळा आहे. त्यामुळेच राज्यातील शेतकऱ्यांचा विचार करता, राज्य शासनाने ही योजना सुरू केली होती. त्यात शेत पाणंद रस्ते उच्च गुणवत्तापूर्ण आणि बारमाही वापरण्यायोग्य असणे आवश्यक आहे. त्यामुळे पालकमंत्री शेत पाणंद रस्ते योजना राबवण्याबाबत दि. २७ फेब्रुवारी २०१८ च्या शासन निर्णयामध्ये रस्ते गुणवत्तापूर्वक तयार करण्यासाठी सूचनाही देण्यात आल्या होत्या.

विविध सूचनांमध्ये एका गावाहून दुसऱ्या गावात जाणारे रस्ते या प्रवर्गात ग्रामीण रस्ते व हद्दीचे ग्रामीण रस्ते म्हणजेच गावनकाशामध्ये दोन भरीव रेषांनी दाखवलेले असून, या रस्त्याची जमीन कोणत्याही भूमापन क्रमांकामध्ये समाविष्ट केलेली नाही. ग्रामीण गाडीमार्ग म्हणजे गाव नकाशामध्ये दुबार रेशमी दाखवलेले असून, ज्या भूमापन क्षेत्रामधून जाते, त्यामध्ये पोट खराब म्हणून दर्शवलेले आहे अशा रस्त्यांची नोंदणी साडेसोळा ते २१ फूट आहे. पाय मार्ग म्हणजे गाव नकाशामध्ये तुटक रेषेने दर्शविले असून, ज्या भूमापन क्षेत्रामधून जातो, त्यामध्ये पोट खराब म्हणून दर्शवलेले आहे अशा रस्त्यांची रुंदी सव्वाआठ फूट आहे.

शेतावर जाण्याचा पाय मार्ग व गाडी मार्ग या संवर्गांमध्ये हे रस्ते नकाशावर दर्शवलेले नाहीत परंतु वाद निर्माण झाल्यास अशा रस्त्यांबाबत निर्णय देण्याचे अधिकार कलम १४३ नुसार तहसीलदारांना दिलेले आहेत. त्यानुसार वहिवाटीचे असलेले रस्ते; इतर ग्रामीण रस्ते या संवर्गांचा समावेश करण्यात आला आहे. मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्ते योजना या ग्रामपंचायत, जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग किंवा उपविभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा उपविभाग तसेच ज्या ठिकाणी वनजमीन असेल, तेथे वनविभाग अंमलबजावणी करत आहे.

तालुकाकामांची संख्याकामे सुरू
बागलाण15728
चांदवड240
देवळा354
दिंडोरी1750
इगतपुरी580
कळवण505
मालेगाव2227
नांदगाव2870
नाशिक612
निफाड16433
पेठ10
सिन्नर9111
सुरगाणा302
त्र्यंबकेश्वर291
येवला9121
एकूण1475114

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT