नाशिक

Nashik News : नाशिक बनणार क्वालिटी सिटींचा ‘आयडॉल’!

गणेश सोनवणे

केंद्राच्या क्वालिटी सिटी मिशन अंतर्गत निवड झालेले नाशिक हे देशातील पहिलेच शहर ठरले आहे. या मिशन अंतर्गत स्वच्छता, शिक्षण व कौशल्य प्रशिक्षण या क्षेत्रांमध्ये शाश्वत विकास घडविला जाणार असून, नाशिक शहराला 'आयडियल मॉडेल ऑफ क्वालिटी सिटी' स्वरूपात राष्ट्रीय पातळीवर नावारूपास आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत, ही नाशिककरांसाठी अभिमानास्पद बाब म्हणावी लागेल.

कुशल भारत मोहिमेअंतर्गत कौन्सिल आॉफ इंडिया व राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली देशभरातील पाच शहरांची क्वालिटी सिटी म्हणून निवड करण्यात आली आहे. यात पहिला मान नाशिकला मिळाला आहे. नाशिकमध्ये स्वच्छता, शिक्षण आणि कौशल्य विकास या क्षेत्रांमध्ये शाश्वत विकास घडविणे हे या चळवळीचे उद्दीष्ट्य आहे. या अंतर्गत नाशिक महापालिका, क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया, एनएसडीसी, क्रेडाई नाशिक, नाशिक सिटीजन फोरम, श्री रामकृष्ण आरोग्य संस्थान, असोसिएशन ऑफ नाशिक स्कूल्स, बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया, आयएमए, इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स, नाशिक बार असोसिएशन, मराठा विद्या प्रसारक संस्था, नाशिक सराफ असोसिएशन आदी संस्था संघटनांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार केला आहे. या मिशन अंतर्गत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत. केंद्राच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशभरात घेण्यात येणाऱ्या स्वच्छ शहर स्पर्धेत नाशिकला प्रथम क्रमांक मिळवून देण्याचा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे. क्रेडाई नाशिकतर्फे ४५०० बांधकाम कामगार यांचे प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले आहे. त्यातून बांधकाम कामगारांचे कौशल्य वृद्धिंगत होऊन नाशिक शहरातील बांधकाम क्षेत्राचा दर्जा उंचावण्यास मदत होणार आहे. नाशिक महापालिकेतर्फे राबविल्या जाणाऱ्या अंगणवाडी प्रकल्पातील ६००पेक्षा अधिक अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचा प्रशिक्षण कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यातील पहिला प्रशिक्षण वर्ग कालिदास सभागृह येथे पार पडला. त्याप्रमाणेच स्वच्छता कर्मचारी, सिटी लिंक चालक वाहक, घरगुती कामे करणाऱ्या महिला, रिक्षा चालक यांचे देखील प्रशिक्षण कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहेत.

क्वालिटी वॉर्ड संकल्पना

स्वच्छ भारत अभियानात नाशिक शहराचा क्रमांक उंचावण्याच्या हेतूने क्वालिटी सिटी मिशनतर्फे 'क्वालिटी वॉर्ड' ही संकल्पना राबविण्यात येत आहे. यात सध्या निवडक वार्डमधील जागरूक नागरिकांचे ग्रुप तयार करून त्यांना स्वच्छतेच्या उपक्रमात सहभागी करून घेण्यात येत आहे. नागरिक व स्वच्छता कर्मचारी यांच्या समन्वयाने शहर स्वच्छ, सुंदर, प्लास्टिक मुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. या अंतर्गत शहरातील नाशिक पश्चिम विभागातील प्रभाग क्रमांक ७, १२, १३, २० व २३ या प्रभागांची निवड करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जनजागृती

विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेचा संदेश जावा या हेतूने गेल्या ९ ऑक्टोबर रोजी जागतिक पोस्ट दिनाच्या निमित्ताने महापालिका तसेच खाजगी शाळांमधील पाच हजार विद्यार्थ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नाशिक शहराची क्वॉलिटी सिटी मिशन अंतर्गत निवड केल्याबद्दल आभार मानणारे व नाशिक शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी स्वतः काय योगदान देणार याबाबत माहिती देणारे पत्र पाठविले आहेत. तसेच विद्यार्थ्यांनी स्वच्छतेची सामूहिक शपथ घेत स्वच्छतेचा संकल्प केला. शाळांमध्ये पथनाट्याद्वारेही जनजागृती केली जाणार आहे.

शिक्षणाच्या गुणवत्तावाढीसाठी उपाययोजना

क्वॉलिटी सिटी मिशनच्या 'शिक्षण'या क्षेत्राअंतर्गत मनपा व खाजगी शाळांमधील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी योगदान देण्यात येणार आहे. त्या अंतर्गत शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे तसेच विद्यार्थ्यांचा शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी राष्ट्रीय पातळीवरील नावाजलेली संस्था 'नाबेट' नॅशनल ऍक्रेडिएशन बोर्ड फॉर एज्युकेशन अँड ट्रेनिंग आपले योगदान देणार आहे. शाळा गळती रोखण्यासाठी कार्यक्रम आखण्यात येत आहे.

या मिशन अंतर्गत नाशिक शहरातील स्वच्छता, शिक्षण, व कौशल्य प्रशिक्षण या 3 क्षेत्रात शाश्वत विकासाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सर्व संस्था एकत्रित आलेल्या आहेत. या संस्थांच्या एकत्रित प्रयत्नातून नाशिक शहराला 'आयडियल मॉडेल ऑफ कॉलिटी सिटी' स्वरूपात राष्ट्रीय पातळीवर नावारूपास आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

– प्रशांत पाटील, उपायुक्त(समाजकल्याण), मनपा.

क्वालिटी सिटी मिशनची उद्दीष्ट्ये-

* स्वच्छ सर्वेक्षणात नाशिकला प्रथम क्रमांकावर आणणे

* शहरालगतच्या पाच गावांचा आदर्श गाव म्हणून विकास.

* प्रशिक्षण व प्रकल्प पुढे नेण्यासाठी संघटनांच्या माध्यमातून प्रयत्न.

* घरगुती कामगार, बचत गटांची जोडणी.

* औद्योगिक कामगारांना प्रशिक्षित करणे.

* कचऱ्याची विल्हेवाट, वृक्षारोपण, जलसाठ्यांचे संवर्धन

* हवेची गुणवत्ता निर्देशांकात सुधारणा करणे.

* शासकीय शाळांमधील शिक्षणाचा दर्जा सुधारणे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT