चालत्या कारमध्ये चालकाला चक्कर आल्याने शरणपूर पोलिस चौकी सिग्नलवर या कारने दोन रिक्षांना आणि दुचाकीला उडविले.   (छाया : हेमंत घोरपडे )
नाशिक

Nashik News | चारचाकी चालकाला वाहन चालवतांना आली चक्कर अन् मग काय ....

दुचाकीस्वार जखमी; शरणपूर पोलिस चौकी सिग्नलवरील घटना

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : चालत्या कारमध्ये चालकाला चक्कर आल्याने सोमवारी (दि. 4) शरणपूर पोलिस चौकी सिग्नलवर सायंकाळी 5 च्या सुमारास कारने दोन रिक्षांना आणि दुचाकीला उडविले. अपघातात दोन रिक्षांसह दुचाकीचे नुकसान झाले असून, दुचाकीस्वारासह मागील सीटवर बसलेला एक जण जखमी झाला.

शहरात दिवसेंदिवस अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. शरणपूर पोलिस चौकी हा परिसर वाहनांच्या वर्दळीने नेहमीच गजबजलेला असतो. सोमवारी (दि. 4) दुपारी वाहतूक सामान्य असताना, सातपूरकडून त्र्यंबक नाक्याकडे येणार्‍या कारच्या चालकाला शरणपूर पोलिस चौकी सिग्नलजवळ अचानक चक्कर आल्यामुळे कारवरील नियंत्रण सुटले.

परिणामी भरधाव असणार्‍या कारने (क्र. एमएच 15, एफटी 5774) दोन रिक्षांसह (एमएच15, एफयू 3144) आणि (एमएच 15, ईएच 1138) अन्य दुचाकीलाही उडविले. अपघातात कारच्या बोनेटचे नुकसान झाले असून, दोन रिक्षांना धडक बसल्याने रिक्षांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. कारने दुचाकीला धडक दिल्यामुळे दुचाकी कारच्या खाली गेली. दुचाकीस्वारासह मागील सीटवर बसलेला एक जण अपघातात जखमी झाला असून, दोघांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नागरिकांनी कारखालून दुचाकीला खेचून बाहेर काढले. अपघातानंतर कार सरकारवाडा पोलिस ठाण्यात जमा करण्यात आल्याचे समजते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT