'hit and run'
'हिट ॲण्ड रन'  file photo
नाशिक

Nashik News |'हिट ॲण्ड रन' रोखण्यासाठी 'फिक्स पॉइंट'

पुढारी वृत्तसेवा
नाशिक : गौरव अहिरे

शहरात मद्यपी वाहनचालकांकडून इतरांच्या जीवास धोका निर्माण होत आहे. बारदान फाटा येथे कारचालकाने पादचारी महिलेस धडक देऊन पळ काढल्याची घटना मंगळवारी (दि. ९) घडली. या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची पोलिस आयुक्तालयाने गंभीर दखल घेतली असून, मद्यपी चालकांचा शोध घेत त्यांची धरपकड करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी 'ड्रंक ॲण्ड ड्राइव्ह' कारवायांमध्ये वाढ करण्यासाठी शहरात पोलिस ठाणेनिहाय 'फिक्स पॉइंट' केले आहेत. तसेच बेशिस्त वाहन चालकांविरोधातील कारवाईत वाढ करण्याचे आदेश दिले आहेत.

नाशिक शहरात गत दोन दिवसांत अपघातांत चौघांचा मृत्यू झाला. कॉलेज रोड, बारदान फाटा, सातपूर येथील पपया नर्सरी आणि गाडेकर मळा येथील अपघातांमध्ये चिमुकलीसह महिला व पुरुषांचा मृत्यू झाला. याआधीही झालेल्या अपघातांमध्ये १०४ जणांचा बळी गेला आहे. त्यापैकी काही वाहनचालक वाहनांसह फरार झाले असून, अद्याप त्यांचा शोध लागलेला नाही. या घटनांची पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गंभीर दखल घेत वाहतूक विभागास कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार वाहतूक उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी चारही युनिटला मद्यपी चालकांसह वाहतूक नियम मोडणाऱ्या चालकांवर कारवाईची सूचना केली आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत शहरातील बेशिस्त वाहनचालकांना जरब बसण्याची शक्यता आहे. यासह 'ड्रंक ॲण्ड ड्राइव्ह'च्या घटना रोखण्यासाठी टवाळखोरांचे अड्डे शोधून तिथेही कारवाई करण्यात येणार आहे. तसेच सीसीटीव्हीमार्फत रॅश ड्रायव्हिंग करणाऱ्यांवर गुन्हे नोंदविण्याचीही सूचना आयुक्तालयाने केली आहे.

शहरात मद्यपी चालकांसह बेशिस्त चालकांवरील कारवायांमध्ये वाढ करीत आहोत. सायंकाळी शहरातील 'ब्लॅक स्पॉट' व इतर संशयास्पद ठिकाणी गस्त वाढविली आहे. नागरिकांनी वाहतूक नियमांचे तंतोतंत पालन करणे बंधनकारक आहे. फिक्स पॉइंटनुसार वाहन तपासणी केली जाईल.
चंद्रकांत खांडवी, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा

कॉलनी रोड बनला मृत्यूचा सापळा

शहरात घटलेल्या १०० अपघातांमध्ये १०४ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी ३६ मृत्यू राष्ट्रीय महामार्गांवर, पाच राज्य महामार्गांवर आणि ६३ मृत्यू शहरातील कॉलनी रस्त्यांवर झाले आहेत. शहरातील रस्त्यांचे जाळे विस्तारले असले तरी अपघात व अपघाती मृत्यूंचे प्रमाण कमी झालेले नाही. प्रशस्त रस्त्यांवरील वाहनांचा वेग, चालकांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन यामुळे सर्वाधिक अपघात झाल्याचे समोर आले आहे.

SCROLL FOR NEXT