सिन्नर : काही महिन्यांपूर्वी नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्ग ६० वरील द्वारका सर्कल ते नाशिक रोड दरम्यानच्या रस्त्यावर तब्बल १९ कोटी ४२ लाख रुपये खर्च करून अस्तरीकरण करण्यात आले होते. मात्र, आता त्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून, मोठ्या प्रमाणात अपघाताच्या घटना होत आहेत. तसेच वाहनधारकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याबाबत खासदार राजाभाऊ वाजे यांनी संताप व्यक्त केला. तसेच, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालय, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाला जाब विचारला आहे.
तब्बल १९ कोटी ४२ लाख रुपये खर्च करून अस्तरीकरण करण्यात आलेल्या द्वारका ते नाशिक रोड राष्ट्रीय महामार्गाची चाळण झाल्याची स्थिती आहे. या रस्त्यावर या जीवघेण्या खड्ड्यांमुळे अनेक अपघात होत आहेत. तसेच चिखल आणि धूळ यांमुळे वाहनधारकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. कोट्यवधी रुपये खर्चून राष्ट्रीय महामार्गाची अशी दुरवस्था झाल्याने खासदार राजाभाऊ वाजे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालय, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांना पत्र लिहून रस्त्याच्या अस्तरीकरण कामाच्या दर्जाची तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, कामाच्या दर्जात काही उणिवा आढळल्यास संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाई करण्याचे सूचित केले. यासह या रस्त्याच्या ठेक्याच्या नियमावलीनुसार रस्त्याची दुरवस्था झाल्यास त्याच्या डागडुजीची जबाबदारी ठेकेदारावर आहे. त्यानुसार त्वरित ठेकेदाराकडून रस्त्याची डागडुजी करून घेण्यात यावी, असेही पत्रात म्हटले आहे.
पत्रात म्हटल्याप्रमाणे या रस्त्याबाबत पुढील १५ दिवसांत कारवाई करून पुन्हा रस्ता सुस्थितीत करावा, अशी सूचना खासदार राजाभाऊ वाजे यांनी केली आहे. अन्यथा त्यांच्याकडून आक्रमक पवित्रा घेतला जाणार आहे.
तब्बल १९ कोटी ४२ लाख रुपये खर्च करून अस्तरीकरण करण्यात आलेला रस्ता अवघ्या काही महिन्यांत चिखलात गेला आहे. त्यामुळे खासदार राजाभाऊ वाजे यांनी कामाच्या दर्जाची तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच कामाच्या दर्जात काही त्रुटी आढळल्यास कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.