महापालिका आयुक्त
नाशिक रोड परिसरात रस्त्यांची पाहणी करताना महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर व अधिकारी.(छाया : हेमंत घोरपडे)

Nashik News | आमदारांच्या इशाऱ्यानंतर नाशिक मनपा आयुक्त 'फिल्ड'वर

जेल रोड, सिन्नर फाटा, लॅम रोड, वडनेरगेट रस्त्यांची पाहणी
Published on

नाशिक : भाजप आमदारांच्या इशाऱ्यानंतर महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर 'फिल्ड'वर उतरले असून, शनिवारी (दि. ७) त्यांनी नाशिक रोड विभागातील जेल रोड, सिन्नर फाटा परिसर, वडनेरगेट रस्ता, देवळाली लॅम रोड भागातील रस्त्यांची पाहणी करत रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजविण्याचे आदेश दिले.

पावसामुळे शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे, अवेळी व कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा, अस्वच्छ गटारे आदी प्रश्नांवर भाजप आमदार प्रा. देवयानी फरांदे, आमदार ॲड. राहुल ढिकले यांनी गेल्या मंगळवारी (दि. ३) महापालिका आयुक्त डॉ. करंजकर यांची भेट घेत नाराजी व्यक्त केली होती. आयुक्तांचे नागरी प्रश्नांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप करत आयुक्तांनी शहरात फिरून नागरी प्रश्न जाणून घेण्याचीही सूचना या आमदारांनी केली होती. शहरातील नागरी प्रश्नांची आठ दिवसांत सोडवणूक न झाल्यास आयुक्तांसह पालिकेतील अधिकाऱ्यांना रस्त्यांवर फिरू न देण्याचा इशाराही यावेळी आमदारांनी दिला होता. त्यानंतर आयुक्त ॲक्शन मोडवर आले असून, शुक्रवारी (दि. ६) त्यांनी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानाची पाहणी करत तेथील समस्या जाणून घेतल्यानंतर शनिवारी त्यांनी नाशिक रोड विभागातील रस्त्यांच्या दुरवस्थेची पाहणी केली.

जेल रोड, सिन्नर फाटा परिसर, वडनेर गेट रस्ता, देवळाली लॅम रोड भागातील रस्त्यांची पाहणी करून उत्सव काळात रस्त्यांची तातडीने डागडुजी करून खड्डे बुजवण्याचे आदेश त्यांनी दिले. नागरिकांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत रस्ते दुरुस्ती करणे, डागडुजी करणे, खड्डे बुजवणे, दुभाजक स्वच्छ करणे आदी सूचना आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिल्या. या पाहणीप्रसंगी अतिरिक्त आयुक्त (शहर) प्रदीप चौधरी, शहर अभियंता संजय अग्रवाल, कार्यकारी अभियंता संदेश शिंदे, उपअभियंता नीलेश साळी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news