नाशिक

Nashik News | वर्षभरात ११,४४७ कृषिनिविष्ठा केंद्रावर कारवाई, ३४ लाखांचा बोगस माल जप्त

गणेश सोनवणे

नाशिक पुढारी वृत्तसेवा- गत वर्षभरात जिल्ह्यामधील साडेअकरा हजार कृषिनिविष्ठा केंद्रांची तपासणी करत कृषिविभागाच्या गुणवत्ता नियंत्रण विभागाने तब्बल ३४ लाखांची बोगस बियाणे, खते आणि कीटकनाशकांचा साठा जप्त केलेला आहे. आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषि विभागाने शेतकऱ्यांना सावध राहून खते, बियाणे खरेदी करण्याचे तसेच बोगस बियाणांची विक्री कुठे होत असेल, तर तत्काळ माहिती देण्याचेही आ‌वाहन केले आहे.

बेकायदेशीर व विनापरवाना खते, बनावट प्रतिबंधित केलेली बियाणे, खते आणि कीटकनाशकांची विक्री करणाऱ्या ११ हजार ४४७ कृषिनिविष्ठा केंद्रावर जिल्ह्यातील १७ भरारी पथकाने कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये जवळपास १६ लाख ७४ हजार रुपयांची खते, १३ लाख आठ हजारांचे बोगस बियाणे आणि चार लाख पाच हजार रुपयांचे बोगस कीटकनाशके जप्त केली आहेत. आगामी हंगामापूर्वीही प्रशासनाने कारवाई सातत्य ठेऊन शेतकऱ्यांची फसवणूक टाळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

आता तालुकास्तरावर कक्ष

गुणवत्ता नियंत्रण विभागाने निरीक्षकांचे तसेच विक्रेत्यांचे तालुकास्तरीय हंगामपूर्व प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आले आहेत. जिल्ह्यामध्ये १७ विविध भरारी पथके गठीत केली होती. कृषि विभागाच्या वतीने आता जिल्हा आणि तालुकास्तर अशी तक्रार निवारण कक्षाची स्थापना केली असून, यावर येणाऱ्या तक्रारींवर कार्यवाहीसाठी विशेष सेल तयार करण्यात आला आहे.

कृषि विभागातर्फे करण्यात येणाऱ्या उपाययोजना

* अनुदानित खतांचा संतुलित वापर होण्याच्या दृष्टीने जमीन आरोग्यपत्रिका आधारित खतांचा वापर प्रचार.

* संयुक्त खतांचा पर्याय म्हणून सिंगल सुपर फॉस्फेट व इतर पर्यायी खते वापरणे.

* फळपिके व ऊस पिकासाठी नॅनो युरियाचा वापर करणे.

* सिटी कंपोस्ट, विद्राव्य खते, व्हर्मी कंपोस्ट आदींचा वापर वाढविण्यासाठी क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी यांच्यामार्फत जागृती.

* रेल्वे धक्क्यावरून खते वेळेत वितरकापर्यंत पोहोचविण्यासाठी रेल्वेचे अधिकारी, कामगार आयुक्त व खत ट्रान्सपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे.

* महसूल व पोलिस विभागाबरोबर समन्वय साधून बोगस कृषिनिविष्ठा विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई.

हेही वाचा –

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT