नाशिक

Nashik News : चांदवड तालुक्यात पाण्याअभावी १३ गावे, २५ वाड्यांचा पुरवठा ठप्प

गणेश सोनवणे

चांदवड(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा– नवीन पाईपलाईन जोडण्याच्या नावाखाली महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची ४४ गाव पाणीपुरवठा योजना गेल्या १५ दिवसापासून बंद पडली आहे. परिणामी या योजनेवर अवलंबून असणारे तालुक्यातील ७० गावे तसेच दुष्काळी १३ गावे व २५ वाड्यांना टँकरव्दारे केला जाणारा पाणी पुरवठा देखील बंद असल्याने नागरिकांचे मोठे हाल असून, प्रशासनाप्रती रोष वाढला आहे.

ओझरखेड धरणातून चांदवड तालुक्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची ४४ गाव पाणी पुरवठा योजना सुरु आहे. ही योजना जुनी झाल्याने जलवाहिनी फुटून पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी होते. तालुक्यातील आडगाव फाटा ते मंगरूळ दरम्यान मोठ्या प्रमाणात गळती असल्याने यादरम्यान नवीन जलवाहिनी उभारण्यात आली आहे. नवीन जलवाहिनी मुख्य जलवाहिनीला जोडण्यासाठी १८ ते २१ जानेवारी दरम्यान एमजीपीने ४४ गाव पाणी पुरवठा योजना बंद ठेवली. त्यानंतर योजना सुरु होणे अपेक्षीत होते. मात्र योजना सुरु झाली नाही. परिणामी आज १५ ते २० दिवस उलटून देखील पाणी पुरवठा सुरु न झाल्याने तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नळाला पाणी येत नसल्याने नागरिकांना दूर वरून पाणी आणावे लागत आहे.

चांदवड तालुक्यात चालूवर्षी भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. तालुक्यातील दुष्काळी १३ गावे, २५ वाड्यांना ४४ गाव पाणी पुरवठा योजनेतूनच टँकरद्वारे दररोज पाणीपुरवठा केला जातो. मात्र गेल्या १५ दिवसापासून योजना बंद पडल्याने दुष्काळी गावांना होणारा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. याचा सर्वाधिक फटका दुष्काळी भागातील नागरिकांना बसला आहे. दुष्काळी गावे व वाड्यांमधील जलस्त्रोत आटल्याने पिण्यासाठी पाणी आणायचे कुठून? असा गंभीर प्रश्न पडला आहे.

ग्लास भर पाणी आणायचे कुटून असा प्रश्न पडला आहे. लोकप्रतिनिधींचा वचक नसल्यानेच सर्वसामान्य जनतेचे हाल होत आहे. आमदारांनी स्वतः लक्ष घालून पिण्याच्या पाण्याचे नियोजन करावे. – उषाताई जेजुरे, माजी सरपंच, डोणगाव

एमजीपीच्या ४४ गाव पाणी पुरवठा योजनेतून मोठ्या प्रमाणात पाणी चोरी केली जाते. वारंवार जलवाहिनी फुटण्याच्या घटना घडतात. लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याने अधिकारी, कर्मचारी वेळेत कामे करत नाहीत. परिणामी त्यांचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. – संजय जाधव, सभापती, कृउबा, चांदवड.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT