नाशिक: जिल्हा परिषदेमध्ये ठेकेदारी करण्याचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी बनावट कागदपत्र सादर केल्याप्रकरणी देवेंद्र गुरुदेव कांदे (रा. तामसवाडी) याच्यावर भद्रकाली पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात कनिष्ठ प्रशासन अधिकारी प्रदीप रतन अहिरे यांनी फिर्याद दिली आहे. गुरुदेव कांदे यांच्यावर अलीकडेच बलात्कार व जीवे मारण्याची धमकीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
'गुरुकृपा इंटरप्राईजेस' ठेकेदारीचा परवाना
देवेंद्र गुरुदेव कांदे यांच्या मालकीचा गुरुकृपा इंटरप्राईजेस या नावाने ठेकेदारीचा परवाना आहे. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली होती. मात्र कागदपत्रांची सत्यता पडताळणी केली असता बनावट कागदपत्र सादर करून ठेकेदार नोंदणी प्रमाणपत्र नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त केल्याचे निष्पन्न झाले.
त्यामुळे प्रशासनाकडून त्याच्याविरोधात तक्रार नोंदविण्यात आली आहे. या प्रकरणात सादर केलेल्या कागदपत्रांचा सखोल तपास झाल्यास प्राप्तीकर विभागाशी संबंधितसुध्दा काही बाबी उघडकीस येणार आहेत. सहाय्यक पोलिस निरीक्षक वसंत पवार या घटनेचा तपास करत आहेत.