नाशिक : जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्लाचा शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निषेध करण्यात आला. यावेळी संतप्त झालेल्या मनसैनिकांनी पाकिस्तानचा राष्ट्रध्वज, पंतप्रधान यांच्या प्रतीकात्मक प्रतिमेला जोडे मारून दहन करण्यात आले. तसेच पाकविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
मनसे कार्यालयाबाहेर बुधवारी (दि. २३) हा निषेध नोंदविण्यात आला. कश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगामपासून ६ किमीवरील बॅसरन व्हॅली या निसर्गरम्य पर्यटनस्थळावर मंगळवारी अतिरेक्यांनी मोठा हल्ला केला. त्यात २७ पर्यटक मृत्युमुखी पडले. पाकिस्तानी 'लष्कर - ए – तोयबाशी' संबंधित दहशतवादी संघटना 'टीआरएफ'ने हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. त्यावर 'मनसे'तर्फे पाकिस्तानचा राष्ट्रध्वज, पंतप्रधान यांच्या प्रतिमेला जोडे मारत, राष्ट्रध्वजाचे दहन करण्यात आले. पाकिस्तान मुर्दाबाद, दहशतवादी संघटना मुर्दाबाद अशा घोषणा देत, निषेध नोंदवण्यात आला. भ्याड हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली.
देशातील सर्व राजकीय पक्षांनी एकत्रित येऊन देशाची अखंडता कायम राहण्यासाठी दहशतवादी संघटनांविरोधात लढा दिला पाहिजे. अशा भावना पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केल्या. आंदोलनाप्रसंगी सलीम शेख, अंकुश पवार, सुदाम कोंबडे, सुजाता डेरे, सचिन सिन्हा, नितीन माळी, सत्यम खंडाळे, अर्चना जाधव, ज्योती शिंदे, आरती खिराडकर, गौरी सोनार, मिलिंद कांबळे, नितीन अहिरराव, अमित गांगुर्डे, तुषार गांगुर्डे, बबलू ठाकूर आदी मनसैनिक उपस्थित होते.