नाशिक

Nashik News | हेमंत गोडसे यांच्या विजयाचे बॅनर्स गोडाउनमध्येच

अंजली राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – नाशिक लोकसभा मतदारसंघातून राजाभाऊ वाजे यांचा विजय दृष्टिपथात येताच शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून 'खासदार' असा उल्लेख असलेले वाजे यांच्या स्वागताचे, अभिनंदनाचे बॅनर्स शहरभर झळकले.

लोकसभेच्या नाशिक मतदारसंघाची मतमोजणी मंगळवारी (दि. 4) अंबड येथील केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामात पार पडली. पहिल्या फेरीपासून वाजे यांनी घेतलेली मतांची आघाडी शेवटच्या ३०व्या फेरीपर्यंत कायम राहिली. अगदी टपाली मतदानातही वाजे यांनी सर्वाधिक मते मिळविली. 11 व्या फेरीअखेर वाजे यांनी एक लाख तीन हजार ३९१ मतांची आघाडी घेतली होती. ही मतांची आघाडी तोडणे शक्य नसल्याचे गोडसे समर्थकांच्या लक्षात येताच वाजे समर्थकांनी जल्लोष करण्यास सुरुवात केली. दुपारी 12 वाजताच सिन्नरमध्ये वाजे यांच्या मिरवणुकीला सुरुवात झाली, तर शिवसेना ठाकरे गटाच्या शालिमार येथील मध्यवर्ती कार्यालयाजवळ फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. वाजे यांच्या विजयाचे बॅनर शहरांमध्ये झळकले. मुंबई नाका येथे खासदार असा उल्लेख असलेला भव्य बॅनर चर्चेत आला. ज्यावेळी बॅनर लावला गेला, त्यावेळी वाजे यांची खासदारकी जाहीर झालेली नव्हती. परंतु, विजयाची खात्री झाल्याने निकालापूर्वीच कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

गोडसेंचे बॅनर्स गोडाउनमध्येच

नाशिकमधून उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच गोडसे यांनी महायुतीचे उमेदवार म्हणून पत्रके छापली होती. या पत्रकांचे वाटपही गोडसे समर्थकांकडून उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच झाले होते. गोडसे नाशिककमधून हॅट्ट्रिक साधतील, असा विश्वास त्यांच्या समर्थकांना होता. त्यासाठी गोडसे यांच्या विजयाचे बॅनर्सही तयार केले होते. परंतु, वाजे यांनी पहिल्या फेरीपासून घेतलेली आघाडी शेवटच्या फेरीपर्यंत कायम राहिल्याने हे बॅनर्स गोडाउनमधून बाहेर पडू शकले नाहीत.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT