नाशिक : खरीप हंगामात रासायनिक खतांची विक्री करताना शेतकऱ्यांना अनावश्यक कृषी निविष्ठा घेण्यास भाग पाडू नये, असे स्पष्ट निर्देश कृषी आयुक्तालयाच्या गुणनियंत्रण विभागाचे संचालक सुनील बोरकर यांनी दिले आहेत. खतांच्या विक्रीसोबत अन्य निविष्ठांचे लिंकिंग करून कोणत्याही प्रकारे सक्ती करण्यात येऊ नये, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा उत्पादक व विक्रेते यांचे खरीप हंगामपूर्व प्रशिक्षण पार पडले. यावेळी विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर, नाशिक ॲग्रो डिलर्स असोसिएशनचे (नाडा) अध्यक्ष अरुण मुळाणे, उपविभागीय कृषी अधिकारी आर. डी. वाघ, मोहीम अधिकारी दीपक सोमवंशी, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक डॉ. जगन सूर्यवंशी, तंत्र अधिकारी (गुणवत्ता नियंत्रण) उल्हास ठाकूर उपस्थित होते.
या प्रशिक्षण वर्गात फवारणी करताना घ्यावयाची काळजी व कृषी बियाणे खरेदी करताना घ्यावयाची काळजी याबाबतच्या घडीपत्रिका व पोस्टर्स यांचे अनावरण करण्यात आले. यावेळी 'नाडा'चे प्रतिनिधी, माफदा, ओमा या संघटनेचे प्रतिनिधी व जिल्ह्याचे कृषी निविष्ठा उत्पादक व विक्रेते उपस्थित होते. विजय धात्रक यांनी सूत्रसंचालन केले.
शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे विक्री हाेण्यासाठी 'साथी' या पोर्टलचा वापर करावा. तसेच रासायनिक खतांची विक्री करताना ई-पॉस प्रणाली वापरण्याचे आवाहन बोरकर यांनी केले. तर, काटकर यांनी, कृषी निविष्ठा विक्री करताना गुणवत्तेकडे लक्ष द्यावे. तसेच केवळ नफा न बघता एकूण उलाढाल लक्षात घ्यावी. शेतकरी हा आपला मौल्यवान ग्राहक आहे. त्यासाठी योग्य मार्गदर्शन व सल्ला द्यावा. तसेच बाजारात उपलब्ध 'पीजीआर'ची विक्री अल्प प्रमाणात करावी, असे सांगितले.
आपण सर्व शेतकरी कुटुंबातील असल्याने शेतकऱ्यांच्या हितासाठी दर्जेदार खते, बियाणे व कीटकनाशकांच्या विक्रीबरोबर तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार करणे गरजेचे आहे. शेतकऱ्याचा विकास हेच आपले ध्येय प्रत्येकाचे असले पाहिजे.अरुण मुळाण, अध्यक्ष, नाशिक ॲग्रो डिलर्स असोसिएशनचे (नाडा).