खत, बियाणे कंपन्यांमध्ये कृषी विभागातील अधिकाऱ्यांचा कोट्यावधी रुपयांचा घोटाळा
बीड : कृषी विभागात वर्षानुवर्ष ठाण मांडून बसलेल्या 30 अधिकाऱ्यांनी खत आणि बियाण्यांच्या 43 कंपन्या कुटुंब तसेच नातेवाईक, मित्राच्या नावे स्थापन करून कोट्यावधी रुपयांचा घोटाळा केल्याचा धक्कादायक आरोप भाजपा आमदार सुरेश धस यांनी केला. या सर्व प्रकरणाबाबत आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे देखील सुरेश धस यांनी आष्टी येथील निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
भाजप आमदार सुरेश धस यांच्या आष्टी येथील निवासस्थानी मंगळवारी सायंकाळी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागात वर्षानुवर्ष सुरू असलेल्या भ्रष्टाचाराबाबत मोठा खुलासा केला. कृषी विभागातील तीस अधिकारी आहेत त्यांनी 43 कंपन्या स्थापन केल्या आहेत. या कंपन्या खत आणि बियाणे उत्पादित करतात. त्या सर्व कंपन्या त्यांच्या कुटुंबीय तसेच नातेवाईक आणि मित्रांच्या नावावर आहेत. या माध्यमातून राज्यभरातील शेतकऱ्यांना निकृष्ट दर्जाचे खत, बियाणं पुरवठा केला जातो. परंतु त्याच्या दर्जाची तपासणी मात्र कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून होत नाही.
कारण याच विभागातील वरिष्ठ अधिकारी तसे आदेश जिल्हा व तालुका पातळीवरील कृषी विभागातील अधिकाऱ्यांना देतात. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. या सर्व प्रकाराबाबत मी माहिती घेतली असून त्याबाबतचा तारांकित प्रश्न देखील मी उपस्थित केला होता. त्यानुसार जी माहिती समोर आली आहे ती सर्व माहिती घेऊन मी आता मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. कृषी मंत्री किती जरी बदलले तरी हे अधिकारी मात्र कायम असून एक मोठी लॉबी यामागे सक्रिय असल्याचा आरोप देखील सुरेश धस यांनी यावेळी केला. या सर्व प्रकाराला कृषी विक्रेते देखील त्रस्त झाले असून त्यांना मात्र याबाबत कुठलाही आवाज उठवता येत नसल्याने आपणच हा प्रश्न हाती घेतला असल्याचे देखील सुरेश धस यांनी म्हटले आहे.

