नाशिक : चेन्नई - नाशिक - सुरत या महत्त्वाकांक्षी द्रुतगती महामार्गास गती द्यावी, अशी मागणी निमा शिष्टमंडळाने केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निमा अध्यक्ष आशिष नहार यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने नागपूर येथे गडकरी यांची भेट घेऊन नाशिकशी निगडित विविध विषयांवर चर्चा केली. (National Integrated Medical Association)
चैन्नई-नाशिक-सुरत हा द्रुतगती महामार्ग औद्योगिक क्षेत्रात क्रांती घडविणारा तसेच जलद वाहतूक आणि निर्यातीला प्रोत्साहन देणारा महामार्ग ठरणार आहे. त्यामुळे त्याच्या मार्गात येणारे अडथळे दूर करून लवकरात लवकर तो पूर्ण कसा होईल, यादृष्टीने संबंधितांना सूचना देणे गरजेचे आहे. नाशिकच्या दृष्टीने समृद्धी महामार्ग वाढवण बंदरापर्यंत कनेक्ट होणे गरजेचे असून, त्यासही चालना मिळावी. द्वारका सर्कल ते नाशिकरोड उड्डाणपूल आणि त्यावरून मेट्रो या प्रकल्पाचाही तातडीने विचार व्हावा. दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉरच्या दुसरा टप्प्यात नाशिकचा समावेश करण्यासाठी आपण शिफारस करावी आदी विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून रस्ता दुरुस्ती व देखभाल सक्तीने करण्याच्या सूचना देण्याची विनंतीही यावेळी शिष्टमंडळाच्या वतीने करण्यात आली.
दरम्यान, केंद्रीय मंत्री गडकरी यांनी, सर्व प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. यावेळी निमा सचिव राजेंद्र अहिरे, उपाध्यक्ष मनीष रावल, खजिनदार राजेंद्र वडनेरे, मिलिंद राजपूत, कैलास पाटील आदी उपस्थित होते.
नाशिकहून मुंबईला समुद्रीमार्गे गेल्यास घोटी येथे टोल भरून पुढे समृद्धी महामार्गावरही १४० रुपयांचा अतिरिक्त टोल भरावा लागत आहे. ठराविक अंतराने दोन ठिकाणी भरावा लागणारा टोल हा भुर्दंड असून, यात लक्ष घालून वाहनधारकांना दिलासा द्यावा, अशी मागणीही मंत्री गडकरी यांच्याकडे करण्यात आली.
नाशिक-पुणे महामार्गाची स्थिती दयनीय आहे. खड्ड्यांचे साम्राज्य व असुरक्षित मार्गामुळे अपघातांचा धोका वाढतो व मालवाहतुकीलाही विलंब होतो. आगामी सिंहस्थ कुंभमेळा लक्षात घेऊन या रस्त्याची तसेच नाशिकला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांची तातडीने दुरुस्ती व्हावी. दीर्घकालीन पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. नाशिक-मुंबई प्रवासादरम्यान समृद्धी महामार्गावरून आमणे येथे आल्यास प्रचंड वाहतूक कोंडी होते. यामुळे व्यापक दुरुस्तीचे काम तातडीने हाती घ्यावेत. रस्ता रुंदीकरण करावे. नाशिक रिंगरोड प्रकल्पाची अंमलबजावणी जलद करावी आदी मागण्याही यावेळी करण्यात आल्या.