accident file photo
नाशिक

Nashik News | सातपूर- त्र्यंबक मुख्य रस्त्यावर अपघाताची मालिका सुरूच

सातपूर - त्र्यंबक मुख्य रस्ता वाहतूकदारांसाठी मृत्यूचा सापळा; वर्षभरात अनेक अपघाती मृत्यू

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : सातपूर - त्र्यंबक मुख्य रस्ता हा वाहतूकदारांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे. गेल्या वर्षभरात अपघाताची संख्या शेकडोच्यावर असून, चालू वर्षात अनेकांना आपल्या प्राणास मुकावे लागले असल्याची नोंद पोलिस दप्तरी आहे. दरम्यान, पपया नर्सरी येथील शिव हॉस्पिटलसमोर नुकत्याच एका 71 वर्षीय आजोबांना झालेल्या अपघातात आपल्या प्राणास मुकावे लागले असून, या ठिकाणी दुभाजक टाकण्यात यावे, यासाठी परिसरातील नागरिक एकत्र आले आहेत.

मागील कुंभमेळ्याने शहरातील रस्त्यांची दिशाच बदलून टाकली आहे. त्यातच धार्मिक महत्त्व असलेल्या श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वरला जाणाऱ्या रस्त्याचा अगदी कायापालट करण्यात आला आहे. सिंहस्थात या रस्त्याचे रुंदीकरण झाले होते. त्यावेळी महापालिकेने व सार्वजनिक बांधकाम विभागाने ठिकठिकाणी दोन दुभाजकांमध्ये अंतर (पंक्चर) ठेवले होते. ते अपघातांना निमंत्रण देणारे ठरलेत.

रस्त्यावरील अपघातांचा चढता आलेख बघता, वाहतूक शाखेने कधी लोखंडी बॅरिकेडसच्या सहाय्याने तर कधी पक्के दुभाजकाचे बांधकाम करत मुख्य रस्त्यावरील पंक्चर बंद करत अपघातांना 'कंट्रोल' करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र वेगवान वाहने व बेशिस्त वाहनधारकांमुळे अपघातांना आळा घालण्यात शासन व प्रशासन दोघेही सपशेल अपयशी ठरल्याचे चित्र आहे.

बैठकीत एकवटले स्थानिक

गेल्या २१ नोव्हेंबरला त्र्यंबक रस्त्यावरील शिव हॉस्पिटलसमोर एकनाथ चव्हाण हे वृद्ध रस्ता ओलांडत असताना एका भरधाव रिक्षाने त्यांना धडक दिली. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून परिसरातील नागरिकांनी शासन-प्रशासनाविरोधात एल्गार पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. सूर्यदर्शन कॉलनी, खोडे पार्क, भंदुरे पार्क, विनायक संकुल आणि परिसरातील रहिवाशांनी पुढील दिशा ठरण्यासाठी नुकतीच बैठक घेतली. बैठकीला अविनाश खरे, एकनाथ गांगुर्डे, राजाराम वाजे, कमलाकर पाटील, सूर्यभान दरेकर, श्रीरंग जेधे, किशोर सोनवणे आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT