नाशिक : पुढारी वृत्तसेवा- तब्बल ३५ टक्के दरवाढीला मंजुरी दिल्यानंतरही केवळ मक्तेदाराने ॲनिमल वेल्फेअर बोर्डाचे प्रमाणपत्र सादर केले नसल्याने श्वान निर्बीजीकरणाचा ठेका तडकाफडकी रद्द करावा लागल्यानंतर आता नवीन ठेक्यासाठी एक कोटीचे कंत्राट देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासंदर्भातील प्रस्तावाला महासभेत जादा विषयात मंजुरी देण्यात आली आहे. नाशिकरोड व पंचवटी विभागासाठी एक, तर सिडको, सातपूर, नाशिक पूर्व व नाशिक पश्चिम विभागासाठी स्वतंत्र ठेकेदार यासाठी नियुक्त केला जाणार आहे.
शहरातील मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी ॲनिमल वेल्फेअर बोर्डाच्या निर्देशांनुसार महापालिकेमार्फत २००७ पासून कंत्राटी तत्त्वावर श्वान निर्बीजीकरणाची मोहीम राबविली जात आहे. गेल्या १६ वर्षांत महापालिकेने एक लाखाहून अधिक भटक्या व मोकाट कुत्र्यांवर निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया केली आहे. जुन्याच ठेकेदाराला तब्बल चार वेळा मुदतवाढ दिल्यानंतर गेल्या मे महिन्यात श्वान निर्बीजीकरणासाठी मक्तेदाराची निश्चिती करण्यात आली होती.
गेल्या काही वर्षांत श्वान निर्बीजीकरणासाठी प्रतिशस्त्रक्रिया ६५० रुपये इतका दर अदा केला असताना मे २०२३ मध्ये मक्तेदाराला बोर्डाच्या मार्गदर्शक सूचनांचा संदर्भ देत ३५ टक्के वाढ करून प्रतिशस्त्रक्रिया ९९८ रुपये इतका दर मंजूर करण्यात आला होता. मक्तेदाराने कार्यादेश दिल्याच्या सहा महिन्यांत ॲनिमल वेल्फेअर बोर्डाचे प्रमाणपत्र महापालिकेला सादर करणे बंधनकारक होते. या मुदतीत संबंधित मक्तेदाराने महापालिकेला प्रमाणपत्र सादर केले नाही. त्यामुळे सदर ठेका रद्द करण्याचा निर्णय घेतला. यामुळे श्वान निर्बीजीकरणाची मोहीमच बंद पडल्याने पशुसंवर्धन विभागाने नवीन ठेक्यासाठी बुधवारी (दि.१७) झालेल्या महासभेच्या पटलावर जादा विषयात प्रस्ताव सादर केला होता. नाशिकरोड व पंचवटी विभागासाठी स्वतंत्र ठेका दिला जाणार असून, यासाठी ४० लाखांचा खर्च अपेक्षित आहे. तर सिडको, सातपूर, नाशिक पूर्व व नाशिक पश्चिम विभागासाठी दुसरा ठेकेदार नियुक्त केला जाणार आहे. त्यासाठी ६० लाखांच्या खर्चास प्रशासकीय मंजुरी घेण्यात आली आहे.
श्वास वाहनास जीपीएस, केंद्रात सीसीटीव्ही कॅमेरे
लाखाहून अधिक निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया केल्यानंतरही भटक्या कुत्र्यांची संख्या वाढतच असल्यामुळे निर्बीजीकरणाविषयी संशय व्यक्त केला जातो. निर्बीजीकरण मोहिमेवर लक्ष ठेवण्यासाठी डॉग स्कॉड सोबत असलेल्या श्वान वाहनास जीपीएस यंत्रणा बसविली जाणार आहे. त्याचबरोबर निर्बीजीकरण केंद्रात सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार आहेत.
हेही वाचा :