नाशिक : राज्याच्या शिक्षणमंत्रीपदाची धुरा हाती असलेले दादा भुसे यांच्याकडून शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली जात असली, तरी नाशिक जिल्ह्यातच शिक्षण विभागांतर्गत विविध संवर्गातील तब्बल १ हजार ५९६ पदे रिक्त आहेत. यात सर्वाधिक पदे ही शिक्षकांची रिक्त असून, १५ तालुक्यांपैकी केवळ ४ गटशिक्षणाधिकारी कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे.
मंत्री भुसे यांनी बुधवारी (दि. १६) शिक्षण विभागाचा आढावा घेत आहेत. यात रिक्त पदांचाही आढावा होणार आहे. ही रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावीत, अशी मागणी होत आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण अंतर्गत शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, अधीक्षक, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक, प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक आदी १२ हजार २८४ पदे मंजूर आहेत. यातील १० हजार ६८८ पदे भरलेली आहेत, तर १,५९६ पदे ही रिक्त आहेत.
तालुकास्तरावर शिक्षण विभागाची धुरा सांभाळण्याचे काम गटशिक्षणाधिकारी करत असतात. मात्र, जिल्ह्यातील १५ पैकी ११ तालुक्यांतील गटशिक्षणाधिकारी पदे रिक्त आहेत. केवळ ४ गटशिक्षणाधिकारी कार्यरत आहेत. २५ टक्के पदोन्नती असलेले विस्तार अधिकारी (शिक्षण) यांची २५ पैकी २३ पदे रिक्त आहेत. पदवीधर प्राथमिक शिक्षकांची १,५८३ पदे मंजूर असून, त्यापैकी ७८४ पदे रिक्त आहेत. तर, प्राथमिक शिक्षकांचीही ५७७ पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांवर शिक्षण विभाग काम करत आहे. शिक्षण विभागाकडे सर्वाधिक योजना असून, त्यांची अंमलबजावणी करताना शिक्षण विभागाची कसरत सुरू आहे.