नाशिक: सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये असोसिएशन ऑफ सर्जन्स ऑफ इंडिया (एएसआय) आणि नाशिक सर्जिकल सोसायटी (एनएसएस) यांच्या पुढाकाराने “स्किल एन्हान्समेंट प्रोग्राम” (सेपा) अंतर्गत इंग्वायनल हर्निया या विषयावर एक दिवसाची कार्यशाळेत राज्यभरातील ५० हर्निया शस्त्रक्रिया तज्ज्ञ सहभागी झाले.
इंग्वायनल हर्निया म्हणजे पोटातील आतडीचा भाग पोटाच्या भिंतीतल्या अशक्त भागातून खाली येणे. पुरुषांमध्ये ही समस्या जास्त प्रमाणात आढळते आणि यासाठी शस्त्रक्रिया आवश्यक असते. कार्यशाळेत हर्निया शस्त्रक्रियेतील आधुनिक पद्धती, नवतंत्रज्ञान आणि चिकित्सकीय अनुभवांविषयी सर्जन्सना सखोल माहिती व प्रशिक्षण देण्यात आले. कार्यशाळेदरम्यान हर्निया आजारावर देशात व आंतरराष्ट्रीय स्तरावर वापरल्या जाणाऱ्या विविध शस्त्रक्रिया तंत्रज्ञानांची चिकित्सक माहिती देण्यात आली. सह्याद्री हॉस्पिटलचे संचालक संजय चावला यावेळी म्हणाले, “ अशा वैद्यकीय प्रशिक्षणातून तरुण डॉक्टरांना नवे ज्ञान मिळते आणि रुग्णसेवेची गुणवत्ता वाढते.”
कार्यशाळेला मार्गदर्शक म्हणून डॉ. प्रमोद शिंदे (अध्यक्ष, एडब्लूआर), डॉ. महेश मालू (अध्यक्ष, महाराष्ट्र एएसआय) आणि नाशिक सर्जिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ. नागेश मदनूरकर हे उपस्थित होते. सह्याद्री हॉस्पिटलचे वरिष्ठ सर्जन डॉ. जी. बी. सिंग आणि नाशिक सर्जिकल सोसायटीचे सचिव डॉ. अमित केले या कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी पुढाकार घेतला. डॉ. हेमंत देवरे, डॉ. प्रशांत मुथाळ, डॉ. संतोष रावलानी, डॉ. डी. वी. जोशी, डॉ. संदीप सबनीस, डॉ. हर्षद महात्मे आणि डॉ. नितीन बस्ते यांनी आपले अनुभव सादर केले. याचबरोबर डॉ. मालेगावकर, डॉ. गोविंद कुलकर्णी, डॉ. रमेश पाटील आणि डॉ. यामिनी सोरटे हे उपस्थित होते.
कार्यशाळा समारोपप्रसंगी डॉ. मदनूरकर म्हणाले की, नाशिक सर्जिकल सोसायटी केवळ वैद्यकीय ज्ञानवृद्धीपुरती मर्यादित न राहता समाजाप्रती आपली जबाबदारीही तेवढ्याच गांभीर्याने पार पाडते. या सामाजिक बांधिलकीचा एक भाग म्हणून जून महिन्यात मोफत हर्निया शस्त्रक्रिया मोहीम राबवण्यात येणार आहे."