NEET Paper Leak Nashik Connection  File Photo
नाशिक

NEET paper leak case Nashik | नीट' पेपरफुटी प्रकरणाला नवे वळण, शुभम खैरनारच्या फ्लॅटची तपासणी

सीबीआय पथक दिल्लीला रवाना : नवे धागेदोरे समोर येण्याची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

NEET paper leak case new twist in Nashik

नाशिक : देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या 'नीट' पेपरफुटी प्रकरणातील संशयित आरोपी शुभम खैरनार याच्या नाशिकमधील भाड्याच्या फ्लॅटची तपास यंत्रणांकडून प्राथमिक तपासणी करण्यात आली आहे. मुंबई नाका पोलिसांच्या मदतीने करण्यात आलेल्या या तपासणीत फ्लॅटमधील लॅपटॉप, पुस्तके, फाइल्स, वैद्यकीय शिक्षणाशी संबंधित नोट्स आणि काही महत्त्वाची कागदपत्रे तपासण्यात आली. मात्र, अद्याप कोणतीही वस्तू अधिकृतरीत्या जप्त करण्यात आली नसल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

मुंबई नाका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विश्वास पाटील यांनी सांगितले की, सध्या पाहणी करून प्राथमिक माहिती संकलित करण्यात आली आहे. पुढील जप्ती किवा कारवाईचा अधिकार केंद्रीय अन्वेषण विभागाकडे असून, आमचा अहवाल सीबीआयकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. शुभमला ताब्यात घेतल्यानंतर सीबीआयचे पथक दिल्लीकडे रवाना झाले. पुढील टप्प्यात पुन्हा नाशिकमध्ये येऊन फ्लॅटची सखोल झडती घेण्याची शक्यता आहे. फ्लॅट मालक, शेजारी, मित्र परिवार तसेच वैद्यकीय शिक्षण क्षेत्राशी संबंधित काही व्यक्तींचे जबाबही नोंदवले जाण्याची शक्यता आहे.

शुभमसोबत फ्लॅटमध्ये वास्तव्यास असलेल्या दोन तरुणांचीही पोलिसांनी चौकशी केली. आमचा या प्रकरणाशी कोणताही संबंध नाही. आम्ही तीन महिन्यांपूर्वी शुभमसोबत राहायला आलो होतो. त्याच्या हालचाली किंवा कथित गैरप्रकारांविषयी आम्हाला काहीच माहिती नव्हती, असा जबाब त्यांनी दिल्याचे समजते. पोलिसांनी या दोघांचे पत्ते संपर्क क्रमांक आणि इतर माहिती नोंदवून घेतली असून, शहर सोडण्यापूर्वी पोलिसांना माहिती देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, या प्रकरणाचा तपास केवळ प्रश्नपत्रिका फुटीपुरता मर्यादित न राहता संपूर्ण रॅकेटचा उलगडा करण्याच्या दिशेने जाऊ शकतो. विशेषतः डिजिटल पुरावे, आर्थिक व्यवहार, शैक्षणिक संस्थांशी असलेले संबंध आणि राज्याबाहेरील नेटवर्क यावर सीबीआयचे लक्ष केंद्रित राहण्याची शक्यता आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, शुभमच्या मोबाइल, लॅपटॉप, ई-मेल, क्लाउड स्टोरेज, टेलिग्राम आणि व्हॉट्सअॅप चॅट्सची फॉरेन्सिक तपासणी केली जाऊ शकते. या प्रकरणात मोठ्या आर्थिक व्यवहारांचा संशय आहे. त्यामुळे बँक खाते, यूपीआय व्यवहार, ऑनलाइन ट्रान्सफर आणि संशयास्पद आर्थिक देवाण घेवाणींचाही मागोवा घेतला जाऊ शकतो.

कोचिंग क्लासेस रडारवर

नाशिकमधील काही कोचिंग क्लासेस, एजंट्स आणि शैक्षणिक संस्थांशी शुभमचे संबंध होते का, याचाही तपास केला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका किंवा उत्तरसंच पुरवण्यासाठी एखादे संघटित जाळे कार्यरत आहे का? याबाबतही तपास सुरू आहे. कॉल रेकॉर्ड, प्रवासाची माहिती आणि इतर राज्यांतील संशयितांशी असलेले संपर्क तपासून राज्याबाहेरील नेटवर्कचा उलगडा करण्याचा प्रयत्न सीबीआय करत आहे.

संशयित शुभम खैरनारच्या भावाची गुन्हेगारी पार्श्वभूमी

नाशिक : देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या 'नीट' पेपरफुटी प्रकरणात सीबीआयच्या ताब्यात असलेला संशयित आरोपी शुभम खैरनार याच्या कुटुंबाची गुन्हेगारी पार्श्वभूमी समोर आल्याने या प्रकरणाला नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मूळ नांदगाव तालुक्यातील असलेल्या खैरनार कुटुंबातील शुभमचा भाऊ भावेश याच्याविरोधात यापूर्वी गावठी पिस्तूल दाखवून धमकावल्याचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. तपास यंत्रणांचे लक्ष आता खैरनार कुटुंबाच्या इतर हालचालींकडेही वळले आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुभमचा संबंध केवळ 'नीट' पेपरफुटीपुरता मर्यादित आहे की गुन्हेगारी नेटवर्कशी त्याचे संबंध आहेत, याचाही तपास आता केला जाणार आहे. त्याचा भाऊ भावेश आणि त्याच्या ओळखीतील व्यक्तीच्या हालचालींबाबतही माहिती संकलित केली जात असल्याचे समजते. यासंदर्भात नाशिक पोलिसांकडून काही व्यक्तींना नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. काही आर्थिक व्यवहार, मोबाइल संपर्क आणि सोशल मीडिया कनेक्शनचीही पडताळणी सुरू असल्याचे समजते.

दरम्यान, 'नीट' परीक्षेचा पेपर फुटल्याचे उघड झाल्यानंतर सीबीआयने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. राजस्थान पोलिसांकडून मिळालेल्या माहितीआधारे संशयित शुभम खैरनार नाशिकमध्ये असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर नाशिक शहर पोलिस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने कारवाई करत त्याला ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीनंतर शुभमला सीबीआयच्या ताब्यात देण्यात आले आहे.

संशयिताने पेहराव बदलला होता. तसेच डोक्यावरील केस काढून ओळख लपविण्याचा प्रय प्रयत्न केला होता. मात्र, तांत्रिक विश्लेषण, स्थानिक माहिती आणि गुप्त तपासाच्या आधारे पोलिसांनी त्याचा माग काढत त्याला ताब्यात घेतले. पोलिसांकडे सुरुवातीला केवळ त्याचा फोटो आणि नाव एवढीच माहिती होती. तरीही अवघ्या काही तासांत त्याचा ठावठिकाणा शोधण्यात पोलिसांना यश आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT