सिडको : राजेंद्र शेळके
अंबड- सातपूर लिंक रोडवरील वाढत्या वाहतूक कोंडीने नागरिक आणि वाहनचालक त्रस्त झाले असून, या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी गरवारे पॉइंट ते सातपूर येथील पपया नर्सरीपर्यंत १३ किलोमीटरचा उड्डाणपूल उभारण्याची मागणी जोर धरत आहे. मुंबईकडून सातपूर औद्योगिक वसाहतीकडे येणारे मालवाहतूक ट्रक आणि कंटेनर तसेच त्र्यंबकेश्वरकडे जाणारी वाहने याच मार्गावरून जातात. त्यामुळे जलद वाहतुकीसाठी उड्डाणपुलाची गरज निर्माण झाली आहे.
अंबड आणि सातपूर या दोन्ही औद्योगिक वसाहतींना जोडणारा अंबड- सातपूर लिंक रोड हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. यावरून दररोज हजारो अवजड वाहने ये- जा करतात. सकाळी आणि संध्याकाळी कामावर जाण्याच्या आणि परतण्याच्या वेळेत तर परिस्थिती अधिकच बिकट होते. वाहतूक कोंडीमुळे प्रवासाचा वेळ वाढतो, इंधनाचा अपव्यय होतो आणि मानसिक ताणही वाढतो. याकडे स्थानिक नागरिकांनी अनेकदा प्रशासनाचे लक्ष वेधले, परंतु अद्याप ठोस उपाययोजना झालेली नाही. तसेच या लिंक रोडलगत चुंचाळे, घरकुल योजना, अंबडगाव, संजीवनगर, जाधव संकुल, भोर टाउनशिप तसेच कॉलनी भाग वसलेला आहे. त्यामुळे या रस्त्यावर सकाळपासून सायंकाळपर्यंत मोठ्या प्रमाणात वर्दळ असते.
प्रस्तावित उड्डाणपुलामुळे मुंबईकडून येणारी अवजड वाहने आणि त्र्यंबकेश्वरकडे जाणारी वाहने थेट उड्डाणपुलावरून जाऊ शकतील. हा उड्डाणपूल औद्योगिक विकासालाही गती देईल, असे मत उद्योजकांनी व्यक्त केले आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास अंबड- सातपूर लिंक रोडवरील वाहतूक व्यवस्था अधिक कार्यक्षम होईल.
अंबड- सातपूर लिंक रोडवर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. गरवारे ते सातपूर पपया नर्सरीपर्यंत उड्डाणपूल झाल्यास वाहतुकीची समस्या कमी होईल.ललित बुब, अध्यक्ष, आयमा
अंबड औद्योगिक वसाहतीतील मुख्य रस्ता असलेल्या अंबड- सातपूर लिंकरोडवर गरवारे- सातपूर पपया नर्सरीपर्यंत उड्डाणपूल उभारण्यासाठी आम्ही उद्योजकांनी लोकप्रतिनिधींना भेटून निवेदन देऊन मागणी केली आहे.गोविंद झा, कोषाध्यक्ष, आयमा
अंबड- सातपूर लिंक रोड खराब झालेला आहे. अनेकदा अपघात होत आहेत. या रस्त्यावर उड्डाणपूल उभारण्याची मागणी उद्योजक, कामगार व नागरिकांनी केलेली आहे.राहुल अरोटे, जिल्हाध्यक्ष, भाजप कामगार मोर्चा
अंबड- सातपूर लिंक रोड उड्डाणपूल होणे गरजेचे आहे. या रस्त्यावर उड्डाणपूल झाल्यास वाहतुकीची समस्या सुटून अपघात कमी होतील.हर्षद बेळे, सहसचिव, आयमा
रस्ता ओलांडताना नागरिकांना मोठी कसरत करावी लागते. कित्येकदा रस्ता ओलांडताना अपघात झालेले आहेत. काहींचे जीव गेले आहेत. या रस्त्यावर उड्डाणपूल उभारला पाहिजे.निवृत्ती इंगोले, सामाजिक कार्यकर्ते