सिन्नर : संदीप भोर
तालुक्यातील कुंदेवाडी येथील जगदंबा माता पतसंस्थेत भोंदू कॅप्टन अशोक खरात याने बनावट खाती उघडून लाखो रुपयांचे व्यवहार केल्याप्रकरणी पतसंस्थेचे माजी चेअरमन तथा विद्यमान संचालक नामकर्ण आवारे यांना अटक झाली आहे. तथापि, आवारे किती दिवस तुरुंगात राहतील किंवा काय याबाबत स्पष्टता नसल्याने सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहतीतील राजकीय हालचालींना वेग आला असून, चेअरमनपदासाठी इच्छुकांनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केल्याची चर्चा आहे.
आवारे यांचा औद्योगिक वसाहतीचे व्यवस्थापक ते चेअरमन, असा सहकारी क्षेत्रातील प्रबास राहिला आहे. गेल्या दोन दशकांपेक्षा अधिक काळापासून त्यांचे भोंदू कॅप्टन अशोक खरात यांच्याशी निकट संबंध होते. खरात यांनी मिरगाव शिवारात स्थापन केलेल्या श्री शिवनिका संस्थानमध्येही आवारे सचिव म्हणून कार्यरत होते. या संबंधांमुळेच जगदंवा पतसंस्थेत खरात यांना संचालकपदासह चेअरमनपदाची संधी मिळाल्याचे बोलले जाते.
दरम्यान, खरात यांनी पतसंस्थेत सुमारे ३२ बनावट खाती उघडून लाखो रुपयांचे व्यवहार केल्याचे समोर आले. याप्रकरणी तपास यंत्रणांनी संस्थेत चौकशी केली. तथापि, बनावट खात्यापैकी एका खातेदाराने सिन्नर पोलिस ठाण्यात व्यवस्थापक अविनाश कांडेकर यांच्यासह आजी-माजी चेअरमन व संचालक मंडळाविरोधात गुन्हा दाखल केला होता. खातेदारांची माहिती न पडताळता व्यवहार करण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला आणि या व्यवहारांना आवारे यांची संमती असल्याचे पोलिस तपासात निष्पत्र झाल्याने त्यांना अटक करण्यात आली. गुरुवारी (दि.१४) न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सोमवारपर्यंत चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
औद्योगिक सहकार कायद्यानुसार संचालकावर गुन्हा दाखल किंवा अटक झाल्याने त्यांचे पद तत्काळ रद्द होत नाही. संबंधिताला गुन्हा सिद्ध होऊन शिक्षा झाल्यानंतरच पद रद्द होऊ शकते, अशी तरतूद असल्याचे जाणकार सांगतात.
त्यामुळे अटक झाली असली तरी आवारे यांचे चेअरमनपद तत्काळ जाण्याची शक्यता कमी असल्याचे बोलले जात आहे. मात्र, उद्योग व उद्योजकांच्या कामकाजात अडथळे येऊ नयेत म्हणून आवारे यांनी स्वेच्छेने राजीनामा दिल्यास नवीन चेअरमनची निवड होऊ शकते. त्यात दुसरी शक्यता अशी आहे की, आवारे यांनी महिना-दोन महिन्यांची रजा घेतली तर संचालक मंडळाकडून व्हा. चेअरमन रामदास डापसे यांना अधिकार बहाल केले जातील. या घडामोडींवर विरोधी गटाचेही बारकाईने लक्ष असून, येत्या काळात सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहतीत कोणत्या घडामोडी घडतात याकडे उद्योग वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
संस्थेतील संख्याबळ असे
सध्या संस्थेत १२ संचालक असून, त्यापैकी आठ संचालक आवारे गटाचे, तर चार संचालक विरोधी गटाचे आहेत. आवारे गटातील सुनील कुंदे हे यापूर्वी नाराज होऊन अलिप्त झाल्याचे सांगितले जाते. उर्वरित संचालकांपैकी चार जणांनी चेअरमनपदासाठी मोर्चेबांधणी सुरू केल्याची चर्चा असून, इच्छुकांची संख्या वाढल्याने स्पर्धा रंगण्याची चिन्हे आहेत.
पाच संचालकांची सल्लामसलत
दरम्यान, या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी गटाच्या पाच संचालकांनी गुरुवारी (दि.१४) एकत्र येऊन संस्थेचे कामकाज सुरळीत सुरू राहण्याच्या दृष्टीने काय निर्णय घेतलेला योग्य राहील, याबाबत सल्लामसलत केल्याचे समजते. या बैठकीत सहकार कायद्यातील तरतुदीचा आधार व वकिलांच्या सल्ल्याने पुढील कार्यवाहीचा निर्णय झाल्याचे समजते.