नाशिक : किरण ताजणे
निफाड तालुक्यातील नैताळे येथील गायरान जमीन बोगस खरेदी-विक्रीद्वारे लाटल्याचा प्रकार 'पुढारी न्यूज' आणि दै 'पुढारी'ने उघडकीस आणल्यानंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तत्कालिन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार चौकशी अहवाल महसूल विभागाला सादर केला होता. आता या प्रकरणी लवरकच कारवाई केली जाणार असल्याचे महसूलमंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.
नैताळे गावात गायरान जमिनीची पंचांच्या वारसांकडून अधिकार नसतानाही परस्पर खरेदी-विक्री करून जवळपास १२ हेक्टर १५ आर म्हणजेच सुमारे ३० एकर गायरान जमीन लाटल्याचा गंभीर प्रकार समोर आला होता. याबाबत गायरान जमीन देणाऱ्या कुटुंबाच्या वारसांनी आवाज उठवत प्रशासकीय चौकशीची मागणी केली होती. याप्रकरणी दै. पुढारीने 'बोगस खरेदीच्या माध्यमातून लाटली ३० एकर जमीन?' या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करत प्रकरणाला वाचा फोडली होती. त्यानंतर महसूलमंत्री बावनकुळे यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत, मंत्रालयात बैठक बोलावली. तसेच महसूल विभागाला या प्रकरणी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार तत्कालिन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी सखोल तपास करून अहवाल महसूल विभागाला पाठविला होता. दरम्यान, अहवाल प्राप्त झाल्यानंतर आता महसुलमंत्री बावनकुळे यांनी लवकरच कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच मंत्री भुजबळ यांनी देखील या घोटाळ्याची गंभीर दखल घेतल्याने, या प्रकरणी हालचाली वाढल्या आहेत.
नैताळे गायरान जमीन प्रकरणाचा तपास झाला आहे. त्यावर लवकरच चांगली कारवाई होईल.चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर आरोप
पंचांच्या वारसांना देखरेखीचा अधिकार असताना भोगवटादार म्हणून नोंद असल्याचा गैरफायदा घेत काही पंचांनी बेकायदेशीर विक्री केली. पंचांच्या वारसांना फसवले गेल्याचेही यात उघडकीस आले आहे. अनेकांना आपल्याला जमीन आहे याबाबतची सुद्धा कल्पना नव्हती, तर काहींना तोकडी रक्कम देत गैरफायदा घेतल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. तसेच गायरान जमिनीचे दस्तएेवज भूमी अभिलेख कार्यालयातून गहाळ केल्याबाबतची तक्रारही निफाड पोलिसात दाखल आहे. राष्ट्रवादीचा कार्यकर्ता राजेंद्र बोरगुडे यांनी नातेवाईकांच्या नावावर बेकायदेशीर खरेदीचे दस्त केल्याचा आरोप आहे.