नाशिक : महापालिका निवडणुकांसाठी मतदार याद्यांच्या कार्यक्रमात राज्य निवडणूक आयोगाकडून दुसऱ्यांदा बदल करण्यात आला असून सुधारीत कार्यक्रमानुसार आता २० नोव्हेंबर रोजी प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. यापूर्वीच्या कार्यक्रमानुसार प्रभागनिहाय मतदार यादी शुक्रवारी(दि.१४) प्रसिध्द केली जाणार होती. या मतदार याद्यांवर २७ नोव्हेंबरपर्यंत हरकती व सूचना दाखल करता येणार आहेत.
नाशिकसह राज्यातील २९ महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांची तयारी राज्य निवडणूक आयोगाकडून सुरू आहे. नाशिक महापालिका हद्दीमध्ये एकूण ३१ प्रभागांच्या हद्दी निश्चित करण्यात आल्या असून त्यास अंतिम स्वरूप देण्यात आले आहे. २९ प्रभाग चार सदस्यीय तर दोन प्रभाग हे तीन सदस्यीय आहेत. प्रभाग क्र. १५ व १९ हे तीन सदस्यीय प्रभाग आहेत. प्रभागनिहाय आरक्षण सोडतही जाहीर करण्यात आली आहे.
प्रभागांच्या हद्दी निश्चित करण्यात आल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने सुरुवातीला १४ आॉक्टोबर रोजी मतदार याद्यांचा कार्यक्रम घोषित केला होता. त्यानुसार ६ नोव्हेंबर रोजी प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार होत्या. त्यानंतर आयोगाकडून सुधारीत कार्यक्रम जाहीर करण्यात आला. त्यानुसार १४ नोव्हेंबरला प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करत त्यावर हरकती व सूचना मागविल्या जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. आता पुन्हा त्यात बदल करण्यात आला असून नव्याने सुधारीत कार्यक्रमानुसार आता २० नोव्हेंबरला प्रारुप मतदार याद्या जाहीर केल्या जाणाऱ्या आहेत.
मतदान केंद्रनिहाय यादी १२ डिसेंबरलाच
सुधारीत कार्यक्रमानुसार आता २० नोव्हेंबरला प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या प्रारुप मतदार याद्यांवर हरकती व सूचनांसाठी २७ नोव्हेंबरपर्यंत मुदत असणार आहे. प्रारुप मतदार यादीवर दाखल हरकतींवर निर्णय घेऊन प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या ५ डिसेंबरला प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. मतदान केंद्रांच्या ठिकाणांची यादी ८ डिसेंबरला तर मतदान केंद्रनिहाय मतदार यादी १२ डिसेंबरला प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही.