नाशिक : नाशिक महापालिकेच्या 31 प्रभागांमधील 122 जागांच्या निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर 735 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले असून, आता शुक्रवारी(दि.16) मतमोजणीतून नाशिककरांनी महापालिकेच्या सत्तेच्या चाव्या कुणाच्या हाती दिल्या ते समोर येणार आहे. सकाळी 10 वाजता 10 केंद्रांवर मतमोजणीला सुरुवात होणार असून, पहिल्या दोन तासांतच निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे.
कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांच्या दाव्यानुसार नाशिकमध्ये पुन्हा कमळ फुलणार, शिवसेना(शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) परिवर्तन घडविणार की, उबाठा-मनसे महाआघाडीचा प्रभाव त्रिशंकू स्थिती निर्माण करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नाशिक महापालिकेसाठी 1,563 मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडली. मतदान यंत्रातील बिघाड, मतदारयाद्यांमधील घोळ, पैसे वाटपाच्या तक्रारींवरून उमेदवारांच्या घरावर प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांचे हल्ले यामुळे ही निवडणूक लक्षवेधी ठरली. आता मतमोजणीद्वारे शुक्रवारी निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाणार आहे.
सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. यासाठी नऊ ठिकाणी 10 मतमोजणी केंद्रे उभारण्यात आली असून, मतमोजणीची तयारीही पूर्ण झाली आहे. पहिल्या टप्प्यात टपाली मतांची मोजणी केली जाईल. त्यानंतर ईव्हीएम यंत्रातील मतांची मोजणी होईल. सकाळी 11.30 वाजता पहिला निकाल बाहेर पडेल. त्यानंतर टप्प्याटप्प्याने सर्वच प्रभागांतील मतदारांचा कौल समजेल. तीनसदस्यांचा प्रभाग असलेल्या 15 व 19 मधील निकाल लवकर होईल. मतमोजणीसाठी 400 अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अशी होईल मतमोजणी ः 10 मतदान केंद्रांवर मतमोजणी होईल. प्रभागनिहाय मतमोजणी केली जाणार आहे. एका प्रभागाची मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर पुढील प्रभागाची मतमोजणी होईल. मतमोजणी केंद्रात उमेदवारांच्या प्रतिनिधींना त्यानुसार प्रवेश दिला जाणार आहे.
प्रभागनिहाय मतमोजणी केंद्र
प्रभाग क्रमांक - मतमोजणीचे ठिकाण
1, 2, 3 - विभागीय क्रीडा संकुल (मीनाताई ठाकरे स्टेडियम, पंचवटी)
4, 5, 6 - विभागीय क्रीडा संकुल (मीनाताई ठाकरे स्टेडियम, पंचवटी)
7, 12, 24 - दादासाहेब गायकवाड सभागृह (मुंबई नाका)
13, 14, 15 - वंदे मातरम सभागृह (डीजीपीनगर)
16, 23, 30 - अटल दिव्यांग स्वाभिमान भवन (मुंबई नाका)
17, 18, 19 - शासकीय तंत्रनिकेतन, सामनगाव रोड, नाशिक
20, 21, 22 - नाशिकरोड विभागीय कार्यालय (दुर्गा गार्डन, नाशिकरोड)
25, 26, 28 - प्रबोधनकार ठाकरे सभागृह (अंबड ठाणे मार्ग, सिडको)
27, 29, 31 - राजे संभाजी स्टेडियम (सिडको)
8, 9, 10, 11 - सातपूर क्लब हाउस, सातपूर