नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महापालिका निवडणुकीचे निकाल घोषित झाले असले, तरी अद्यापही अनेक उमेदवार पराभवाच्या धक्क्यातून सावरले नसल्याचे दिसत आहे. काहींनी स्वतःला एकांतात ठेवले, तर काहींनी अबोला धारण केला. अनेकांनी विविध समाज माध्यमांवर पोस्ट शेअर करीत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. त्यातील अनेकांनी पराभवाचे खापर 'ईव्हीएम' मशीनवर फोडले, तर काहींनी जड अंतकरणाने कौल मान्य असल्याचे सांगत मतदारांचे आभार मानले आहे.
तब्बल आठ वर्षांनंतर घेण्यात आलेल्या महापालिका निवडणुकीत अनेकांनी उडी घेत जिवाचे रान करीत प्रचार केला. पायाला भिंगरी बांधल्याप्रमाणे उमेदवार लोकांच्या दारोदार पोहोचले. अनेक आश्वासने दिली. काहींनी शपथा देत विकासाची ग्वाही दिली. दिवसरात्र प्रचार केला. पाण्यासारखा पैसाही खर्च केला.
कार्यकर्ते दिमतीला ठेवले. एवढे करूनही पराभव पदरी पडल्यामुळे या उमेदवारांना मोठा धक्का बसला आहे. या उमेदवारांचा अद्यापही निकालावर विश्वासच बसत नसून, काहींना अजूनही निकाल मान्य नाही. अशात अनेकांनी समाज माध्यमांचा आधार घेत, आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.
एका उमेदवाराने थेट 'लोकशाही हरली, पैसा जिंकला' असे म्हणत निवडणुकीत झालेल्या पैसावाटपावरच बोट ठेवले. एकाने, 'जनमताची दिवसा हत्या, सर्व यंत्रणा ताब्यात आहेत. चीटिंग करून सत्तेत बसता, कशाला निवडणुका घेता?, जर ईव्हीएम सेट करून जिंकता, तर लोकशाही म्हणूच नका, हुकूमशाही म्हणा' अशा शब्दांत संताप व्यक्त केला.
एका उमेदवाराने, 'मायबाप जनतेने निवडून दिले, पण ईव्हीएममुळे पराभव झाला' असे म्हटले. एकाने तर संतापाच्या भरात f fin 'येथून पुढे फक्त आणि फक्त राजकारण. समाजकारण बंद.' असे म्हटले. एकाने, 'विजय जर मशीनचा नसता, तर इतिहास आज वेगळा असता' असे म्हटले. एका उमेदवाराने, 'तेरे जीत से ज्यादा चर्चे हमारे हार के हैं' असे म्हणून आपल्या भावना व्यक्त केल्या. अनेकांनी, 'जनमताचा कौल मान्य करीत, मतदारांचे आभार मानले. तसेच जनसेवेत कायम राहणार असल्याचा शब्दही दिला.
विजयी उमेदवारांचा जल्लोष
विजयी झालेल्या उमेदवारांनी मात्र, सोशल मीडियावर एकच धुरळा उडवून दिला. गुलालात माखलेले फोटो टाकत, मतदारांचे आभार मानले. तसेच कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीचे फळ मिळाल्याची भावनाही व्यक्त केली. विजयी उमेदवारांच्या पोस्टवर अभिनंदनाचा वर्षाव करीत, आता दिलेल्या आश्वासनांची पूर्ती करा, अशी आठवणही करून दिली.
रडून रडून हाल, घरात कोंडून घेतले
अनेक उमेदवारांना पराभव प्रचंड जिव्हारी लागला. एका महिला उमेदवाराचे रडून रडून अक्षरशः हाल झाले. कुटुंबातील सदस्यांकडून त्यांची समजून काढली जात आहे, मात्र त्यांना पराभव मान्य नसल्याचे त्या सांगत आहेत. एका उमेदवाराने तर स्वतःला घरात कोंडूनच घेतले. फोनही बंद करून ठेवला. कार्यकर्ते भेटण्यासाठी गेले असता, त्यांनाही भेट नाकारली. 'मला एकांतात राहू द्या' असे त्यांनी कुटुंबीयांना सांगितले. बऱ्याच उमेदवारांनी घराबाहेर पडणे टाळले. लोकांच्या भेटीगाठी, कार्यकर्त्यांचा गराडा टाळत, त्यांनी घरीच राहणे पसंत केले.