नाशिक : नाशिक महापालिका निवडणुकीतील प्रचारात वेग आला आहे. यासाठी पक्षाचे कार्यकर्ते सहभागी होत असले तरी प्रचार रॅलीत गर्दी दिसावी त्यासाठी आता रोजंदारीने माणसे जमवली जात आहेत. त्यात महिलांना प्राधान्य दिले जात आहे. मात्र, या गर्दी जमवण्याचा स्पर्धेत रोजंदारीचे दर वाढले आहेत. जो जास्त पैसे देईल, त्याचाकडे प्रचारासाठी जाण्याचा कल वाढला आहे. त्यातच दिवसभर प्रचारानंतर सायंकाळी पैशांसाठी वाद नको, म्हणून मजूरवर्गाने ॲडव्हान्स पेमेंट पद्धतीचा अवलंब केला आहे. उमेदवारांनाही ते द्यावेच लागत असल्याचे चित्र आहे. यावरून एक निश्चित आहे की, उमेदवारांचा प्रचार महागला आहे.
ज्याचाकडे गर्दी जास्त त्याचीच प्रभागात हवा, असे म्हटले जाते. त्यासोबत प्रतिष्ठेचाही प्रश्न उद्भवतो. प्रचार फेरी, कॉर्नर सभा, रोड शो करायचा म्हटले की गर्दी हवीच. गर्दी नसेल तर फ्लॉप शो होतो. त्यामुळे प्रभागातील मतदार, कार्यकर्त्यांवर जास्त विसंबून न राहता उमेदवारांनी आता महिला - पुरुषांची गर्दी आपल्या ताफ्यातच ठेवण्याचे धोरण अवलंबले आहे. त्यामुळे रोजंदारीने महिला-पुरुष व मुले-मुली प्रचारासाठी जमवले जात असल्याचे फॅड या निवडणुकीत वाढले आहे. त्यांना चहा, नाश्त्याबरोबरच मुले -मुलींना 300 ते 500 रुपये, तर महिला - पुरुषांना 800 ते 1000 रुपये दिवसभराचे मानधन द्यावे लागत आहे.
ही हक्काची गर्दी हाताशी असल्याने प्रचारफेरी, रोड शो वेळेत सुरू करणे शक्य असते. अन्यथा नेत्यांचे आगमन झालेले असते. सभा किंवा प्रचार फेरीची वेळ झालेली असते. मात्र, गर्दीच नसते. त्यामुळे फियोस्को होतो. ती वेळ येऊ नये म्हणून पक्षाचे पदाधिकारी व उमेदवार ही तजवीज करताना दिसत आहेत.
नाशिक महापालिका निवडणुकीत रिंगणात प्रमुख पक्षांबरोबरच अपक्ष उमेदवारही मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे प्रभागात आपल्याला कसा चांगला प्रतिसाद आहे, प्रचार फेरीला गर्दी होत आहे, आपलीच हवा आहे, आपल्यालाच मतदारांचा पाठिंबा आहे, हे दाखवावे लागत आहे. त्यामुळे सर्वच उमेदवारांकडून मानधन देऊन महिला, ठराविक कार्यकर्ते गोळा केले जात असल्याचे चित्र आहे.
ॲडव्हान्स बुकिंग, ॲडव्हान्स पेमेंट
नाशिकच्या काही भागांत अशाच प्रकारे महिलांना एका पक्षाचा महिलेने विरोधकाला महिला मिळू नये म्हणून स्वपक्षाच्या उमेदवाराकडे बोलावले. दिवसभर बसवून ठेवले. सायंकाळी महिलांना पैसे न देताच परत पाठवले. त्यावरून मोठा राडा झाला. त्यामुळे मजुरांनीही आता सावध भूमिका घेतली आहे. त्यात प्रतिमहिना मानधन निश्चित झाल्यानंतर जितक्या महिला तेवढे पैसे महिलांची प्रमुख ॲडव्हान्स नोंदणी करून तेवढी रक्कम हातात घेतात. त्यानंतरच प्रचार कामाला निघतात, असे चित्र आहे.
चहा-नाश्ता हवाच
सकाळची प्रचारफेरी साडेदहाच्या सुमारास सुरू होते. त्यामुळे सुरुवातीला चहा - नाश्ता आणि प्रचारफेरी संपल्यानंतर चहाची व्यवस्था करावी लागत आहे. सायंकाळी चार ते सात या वेळेत प्रचारफेरी आणि त्यानंतर कॉर्नर सभा होतात. त्यामुळे चार वाजताच चहा आणि नाश्ता द्यावा लागत आहे.