नाशिक : महापालिकेची करवसुली गेल्या दोन महिन्यांपासून ठप्प झाली आहे. करवसुली विभागातील कर्मचार्यांची नियुक्ती निवडणूक कामासाठी केली गेल्यामुळे कर भरणा केंद्रे ओस पडली आहेत.
येत्या 15 जानेवारीला नाशिक महापालिकेतील 122 जागांसाठी मतदान होणार आहे. 16 जानेवारीला मतमोजणीद्वारे निकाल जाहीर केला जाणार आहे. या निवडणुकीसाठी प्रभागरचनेसाठी करवसुली विभागातील कर्मचार्यांची नियुक्ती केली गेली होती. प्रभागरचना निश्चित झाल्यानंतर मतदारयाद्यांचा कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून घोषित झाला. विधानसभा मतदारयाद्यांची विभागणी करत प्रभागनिहाय प्रारूप मतदारयाद्या प्रसिद्ध करण्यात आल्या. प्रारूप मतदारयाद्यांवर तब्बल 9 हजार 717 हरकती आल्यानंतर त्यांच्या प्रत्यक्ष पडताळणीचे कामही करवसुली विभागातील निरीक्षकांकडेच होते. मतदारयाद्या अंतिम झाल्यानंतर आता या कर्मचार्यांची नियुक्ती प्रत्यक्ष निवडणूक कामासाठी अर्थात मतदान केंद्रे व मतमोजणीसाठी केली जाणार आहेत.
त्यामुळे करवसुलीच्या कामांवर मात्र परिणाम झाला आहे. साधारणत: गेल्या दोन महिन्यांपासून करवसुली ठप्प झाली आहे. 2025-25 या आर्थिक वर्षाकरिता घरपट्टीसाठी 250 कोटी रुपये वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी आतापर्यंत 202 कोटींची वसुली झाली आहे. उर्वरित 48 कोटी रुपये पुढील तीन महिन्यांत वसूल करावे लागणार आहेत. निवडणूक कामासाठी या कर्मचार्यांची नियुक्ती केली नसती, तर आतापर्यंत करवसुलीचा आकडा 230 कोटींवर गेला असता, असे करवसुली विभागातील सूत्रांचे म्हणणे आहे.
अभय योजनेने तारले
करवसुली विभागातील कर्मचार्यांची नियुक्ती निवडणूक कामासाठी केली असली, तरी तत्पूर्वी थकबाकीदारांसाठी लागू करण्यात आलेल्या अभय योजनेतील महसुलाने महापालिकेला तारले आहे. अभय योजनेंतर्गत आतापर्यंत 90 कोटींची थकबाकी वसूल झाली आहे. 21.65 कोटींची दंडमाफी थकबाकीदारांना देण्यात आली आहे. 91 हजार 167 थकबाकीदारांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.