नाशिक : राज्यात नगरपरिषद निवडणुकीत भाजप हाच नंबर एकचा पक्ष ठरला आहे. नाशिक महापालिका निवडणुकीबाबत महायुतीच्या होण्याच्या दृष्टीने बोलणी सुरू आहे. त्यासाठी मंत्री दादा भूसे आणि माजी खासदार समीर भुजबळ यांच्याशी चर्चा झाली आहे, असे नमूद करत नगरपरिषदांप्रमाणेच महापालिकांचे निकालही आश्चर्यकारक असतील, असा दावा भाजपचे प्रभारी तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. महापालिका निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीची अवस्था नगरपरिषद निकालापेक्षाही वाईट होईल, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
महापालिका निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या चर्चेसाठी नाशिकमध्ये आलेल्या मंत्री महाजन यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, नगरपरिषद निवडणुकांचे निकाल हे अपेक्षितच होते. या निवडणुकीत पक्षाचे सर्वच कार्यकर्ते, नेते विशेषत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कष्ट घेतले. त्याचेच फळ निकालातून मिळाले. निवडणुकीत एकनाथ शिंदे दुसऱ्या तर अजित पवार हे तिसऱ्या क्रमांकावर राहिले असून, उबाठा सहाव्या क्रमांकावर आहे, असे नमदू करत महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीची अवस्था यापेक्षाही वाईट असेल, असा टोला महाजन यांनी लगावला.
भगूर, भुसावळ, सिन्नर, त्र्यंबकेश्वर याठिकाणी मित्रपक्षांचा विजय झाला आहे. नगरपरिषदांच्या निवडणुका आम्ही बहुतांश ठिकाणी महायुती म्हणूनच लढलो आणि महापालिका निवडणुकीतही युती म्हणूनच निवडणूक लढविणार असल्याचे मंत्री महाजन यांनी सांगितले. निवडणुकीसाठी आमच्याकडे ८८ जागांसाठी नगरसेवक आहेत. इच्छुक खुप आहेत. यामुळे उमेदवारी देताना मेरिट पाहूनच उमेदवाराची निवड केली जाणार असून, संधी मिळाली नाही म्हणून कोणी पक्षाबाहेर गेले तर ते आणि त्यांचे नशीब असा गर्भित इशाराही महाजन यांनी संभाव्य बंडखोरांना दिला आहे.
जागावाटपात सुवर्णमध्य काढू!
नाशिक महापालिकेच्या निवडणूकीत महायुती व्हावी यासाठी आमची दोन्ही पक्षांच्या नेत्यांशी चर्चा सुरू आहे. उमेदवाराचे मेरीट बघून उमेदवारी दिली जाईल. महायुतीत जागावाटपाची चर्चा फिस्कटली नसून आम्ही सुवर्णमध्य काढू पण महायुतीतच लढू असा दावा मंत्री महाजन यांनी केला आहे.
त्र्यंबकेश्वरचा निकाल अनपेक्षित
त्र्यंबकेश्वरचा निकाल अनपेक्षित असल्याचा दावा महाजन यांनी केला आहे. या ठिकाणी मित्र पक्षांचेच पॅनल असून भगूर, भुसावळ, सिन्नर, त्र्यंबकेश्वर याठिकाणी मित्रपक्षांचा विजय झाला असल्याची सारवासारव महाजन यांनी केली. नगरपरिषदांच्या निवडणुका आम्ही बहुतांश ठिकाणी महायुती म्हणूनच लढलो आणि महापालिका निवडणुकीतही युती म्हणून निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी सांगितले.