नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मार्चएण्डला आता जेमतेम १३ दिवस शिल्लक असताना पाणीपट्टीची अवघी २३ कोटी अर्थात निर्धारित उद्दिष्टाच्या ३० टक्केच वसुली होऊ शकली आहे. मागील थकबाकीसह वसुलीचे २२७ कोटींचे उद्दिष्ट असताना एकूण वसुलीचा आकडा ५५ कोटींपर्यंतच जाऊ शकला आहे.
त्यामुळे पाणीपट्टीच्या थकबाकीदारांविरोधात करवसुली विभागाने बुधवार (दि.१८) पासून धडक मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत पाणीपट्टीची थकबाकी न भरणाऱ्या बड्या थकबाकीदारांचे नळकनेक्शन तोडण्यात येणार आहे.
घरपट्टी थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्तीची कारवाई सुरू केल्यानंतर महापालिकेने आता पाणीपट्टी वसुलीकडे आपला मोर्चा वळवला आहे. मनपाच्या करवसुली विभागातील नोंदीनुसार शहरात एकूण दोन लाख १७ हजार नळकनेक्शन आहेत.
२०२५-२६ या आर्थिक वर्षात पाणीपट्टी वसुलीसाठी ७५ कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी आतापर्यंत २३ कोटींचीच वसुली होऊ शकली आहे. पाणीपट्टीच्या थकबाकी वसुलीसाठी आता जेमतेम १३ दिवसांचाच कालावधी शिल्लक राहिला आहे.
त्यामुळे थकबाकीदारांवर कारवाईसाठी करवसुली विभागाने विशेष पथके तयार केली असून, मोठ्या थकबाकीदारांना नोटिसा देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पाणीपट्टीची थकबाकी न भरल्यास नळजोडणी तोडण्यासह दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
पाणीपट्टीची थकबाकी १७२ कोटींवर
महापालिकेकडे पाणीपट्टीची थकबाकी व चालू बिलांसह एकूण २२७ कोटी ५२ लाख रुपयांचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी थकबाकी ३२ कोटी ६५ लाख रुपये, तर चालू आर्थिक वर्षात २३ कोटी असे ५५ कोटींची वसुली झाली आहे. त्यामुळे अद्यापही नागरिकांकडे १७२ कोटींची थकबाकी आहे. त्यामुळे महापालिकेने आता थकबाकी वसुलीसाठी धडक मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे.