नाशिक महानगरपालिका / Nashik Municipal Corporation Pudhari News Network
नाशिक

Nashik Municipal Corporation : प्रभागनिहाय प्रारूप आरक्षणांची अधिसूचना जारी

हरकती व सूचनांसाठी 24 नोव्हेंबरपर्यंत मुदत

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : नाशिक महापालिकेच्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेने प्रभागनिहाय प्रारूप आरक्षणांची अधिसूचना महापालिकेच्या निवडणूक विभागातर्फे प्रसिध्द करण्यात आली आहे. या आरक्षणांवर हरकती व सूचनांसाठी २४ नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. दरम्यान, सोमवारी(दि.१७) पहिल्या दिवशी आरक्षणांवर एकही हरकत वा सूचना निवडणूक आयोगाला प्राप्त झाली नाही.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार नगरपरिषदा, जिल्हा परिषदा व पंचायत समित्या तसेच महापालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी राज्य निवडणूक आयोगामार्फत सुरू करण्यात आली आहे. नगरपरिषद निवडणुकांच्या तारखा घोषित करण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषद-पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या तारखांची घोषणा येत्या आठवडाभरात होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महापालिका निवडणुकांची घोषणा डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात तर या निवडणुकांसाठी प्रत्यक्ष मतदान जानेवारीच्या शेवटच्या टप्प्यात होण्याची शक्यता आहे.

महापालिका निवडणुकीसाठी राज्य शासनाच्या निर्णयानुसार चार सदस्यीय प्रभागरचना तयार करण्यात आली आहे. नाशिक महापालिकेत २०१७च्या निवडणुकीप्रमाणेच चार सदस्यीय २९ तर तीन सदस्यीय दोन प्रभाग असे १२२ सदस्यसंख्या असलेले एकूण ३१ प्रभाग अस्तित्वात आले आहेत. या प्रभागांसाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार ११ नोव्हेंबर रोजी आयुक्त मनिषा खत्री, उपायुक्त(प्रशासन) लक्ष्मीकांत साताळकर यांच्या उपस्थितीत महाकवी कालिदास कलामंदिरात आरक्षण सोडत काढण्यात आली. या सोडतीनंतर सोमवारी(दि.१७) प्रभागनिहाय प्रारूप आरक्षणांची अधिसूचना प्रसिध्द करण्यात आली असून या आरक्षणांवर हरकती व सूचनांसाठी २४ नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. प्राप्त हरकतीं व सूचनांवर विचार करून मनपा आयुक्त २५ नोव्हेंबर ते १ डिसेंबर कालावधीत निर्णय घेतील. आयोगाच्या मान्यतेनंतर २ डिसेंबर रोजी अंतिम आरक्षण विहित नमुन्यात शासन राजपत्रात प्रसिध्द केले जाईल.

Nashik Latest News

गुरूवारी प्रारूप मतदार याद्या

राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकांसाठी मतदार याद्यांसंदर्भात सलग दुसऱ्यांदा जाहीर केलेल्या सुधारीत कार्यक्रमानुसार येत्या गुरूवारी, २० नोव्हेंबर रोजी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिध्द केल्या जाणार आहेत. या मतदार याद्यांवर २७ नोव्हंबरपर्यंत हरकती व सूचना नोंदविता येणार आहेत. प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या ५ डिसेंबरला तर मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या १२ डिसेंबरला प्रसिध्द केल्या जातील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT