Nashik Municipal Pudhari News Network
नाशिक

Nashik Municipal Corporation | 'ग्रीन बॉण्ड' ला लवकरच सेबीची अंतिम मान्यता

Nashik Municipal Corporation | सर्वसामान्य नागरिकांनाही करता येणार बॉण्ड खरेदी

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सिंहस्थकामांसाठी निधी उभारणीकरिता २०० कोटींच्या म्युनिसिपल बॉण्डपाठोपाठ २०० कोटींचे ग्रीन बॉण्डही बाजारात आणण्याची तयारी महापालिकेने केली आहे. यासाठी ग्रीन बॉण्डचा प्रस्ताव सेबीच्या अंतिम मान्यतेसाठी सादर केला जाणार असून, आठवडाभरात या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

म्युनिसिपल बॉण्ड विशिष्ट वर्गासाठी होते. परंतु, ग्रीन बॉण्डमध्ये सर्वसामान्य नागरिकांनाही सहभागी होता येणार आहे. या माध्यमातून उभारला जाणारा निधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर साकारण्यात येणाऱ्या मुकणे धरण थेट पाइपलाइन विस्तारित योजनेसाठी वापरला जाणार आहे.

नाशिकमध्ये २०२७ मध्ये होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विकासकामांना वेग आला आहे. सिंहस्थांतर्गत नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे तब्बल ३० हजार कोटींची कामे केली जात आहेत. त्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून निधी उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर नाशिक महापालिकेलादेखील सिंहस्थ कामांमध्ये निधी खर्च करावा लागणार आहे. त्यासाठी महापालिकेच्या गत अंदाजपत्रकात ४२५ कोटींची तरतूद करण्यात आली होती.

आतापर्यंत २० हजार कोटींच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. स्व-हिश्श्यापोटी महापालिकेला मोठ्या निधीची आवश्यकता असल्याने म्युनिसिपल बॉण्ड व ग्रीन बॉण्डच्या माध्यमातून निधी उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

पहिल्या टप्प्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या कार्यक्रमात २०० कोटींचे म्युनिसिपल बॉण्ड उभारण्यात आले आहेत. खासगी प्लेसमेंटद्वारे एनएमसी क्लीन गोदावरी बॉण्ड्स २०३० सिरीज १ नावाने बॉण्ड इश्यू झाल्यानंतर पाच वर्षांसाठीच्या म्युनिसिपल बॉण्डला ७.८० टक्के व्याजदर मिळाला.

म्युनिसिपल बॉण्डचे यशस्वी लिस्टिंग झाल्यानंतर आता ग्रीन बॉण्डमधून २०० कोटी रुपये भांडवल उभारण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रारूप प्रस्तावाला सेबीची तांत्रिक मान्यता मिळाली असून, आता अंतिम मान्यतेसाठी प्रस्ताव सादर केला जात आहे.

बॉण्डविषयी जनजागृती करणार

म्युनिसिपल बॉण्ड सर्वसामान्य नागरिकांना खरेदी करण्याची मुभा नव्हती. ग्रीन बॉण्ड मात्र सर्वसामान्य नागरिकांनादेखील खरेदी करता येणार आहेत. त्या दृष्टीने या बॉण्डविषयी महापालिकेच्या माध्यमातून जनजागृती उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्यानंतर हे बॉण्ड बाजारात आणले जातील. जास्तीत जास्त प्रतिसाद मिळावा यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT