नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या अमृत २ योजनेअंतर्गत महापालिकेच्या १९० कोटींच्या मलनिस्सारण योजनेसाठी प्राप्त निविदाधारकांचे आर्थिक देकार उघडण्यात आले असून यासंदर्भातील प्रस्ताव राज्य शासनाच्या उच्चस्तरीय तांत्रिक समितीच्या मान्यतेसाठी सादर केला जाणार केला जाणार आहे. या योजनेच्या माध्यमातून शहरात ८८ किलोमीटर लांबीच्या मलवाहिका टाकण्याचे नियोजन आहे.
नाशिकचा झपाट्याने विस्तार होत आहे. शहरालगत उपनगरे आणि नववसाहती उभ्या राहत आहेत. या वसाहतींमध्ये मलवाहिकांचे जाळे निर्माण करण्याची योजना महापालिकेने आखली आहे. तसेच शहरातील गावठाण भागात जुन्या मलवाहिका बदलून नव्या मलवाहिका टाकल्या जाणार आहेत. त्यादृष्टीने महापालिकेने अमृत योजनेअंतर्गत मलनिसारण योजनेचे सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केले होते. या योजनेला हिरवा कंदील मिळाल्यानंतर महापालिकेच्या पाणी पुरवठा व मलनिसारण विभागाने निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. मलनिसारण योजनेअंतर्गत शहरात सुमारे ८८ किमीच्या मलवाहिका टाकल्या जाणार असून, दोन टप्प्यात ही कामे होणार आहेत. त्यानुसार पहिल्या डीपीआरनुसार आठ निविदा प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी तीन पात्र ठरून त्यातील कमी दराची तसेच दुसऱ्या डीपीआरनुसार सात निविदांपैकी दोन निविदाधारक पात्र ठरले.
कामासाठी 15 महिन्यांची मुदत
मलनिस्सारण योजनेच्या प्रस्तावांना राज्याच्या तांत्रिक समितीची मान्यताम मिळाल्यानंतर यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीच्या मान्यतेसाठी सादर केला जाणार आहे. स्थायीच्या मान्यतेनंतर संबंधित मक्तेदाराला कार्यारंभ आदेश दिले जाणार आहेत. या कामासाठी १५ महिन्यांची मुदत असणार आहे.