Simhastha Kumbh Mela Nashik Pudhari News Network
नाशिक

Nashik Simhastha Kumbh Mela | सिंहस्थ कुंभमेळा 2027 साठी देशभरातून आणि जिल्ह्यातून 236 धार्मिक संस्थांचे अर्ज सादर

Nashik Simhastha Kumbh Mela | पायाभूत सुविधा पुरवण्याची जबाबदारी महापालिकेवर

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरातील साधू-संत, महंत, आखाडे, आश्रम, मंदिरे आणि धार्मिक संस्थांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नाशिक कुंभमेळा प्राधिकरणाकडे एकूण २३६ अर्ज प्राप्त झाले आहेत. या अर्जांची छाननी करून पात्र संस्थांना सुविधा देण्याची जबाबदारी महापालिकेवर सोपविण्यात आली आहे.

महापालिकेच्या लेखा व वित्त विभागािते पुढील कार्यवाहीसाठी हे प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठवले आहेत. सन २०२७ मध्ये नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. या सोहळ्यासाठी साधू-महंतांसह भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सुमारे ३५ हजार कोटी रुपयांची विकासकामे सुरू आहेत.

साधुग्राममध्ये महत्त्वाच्या धार्मिक संस्था आणि आखाड्यांना कायमस्वरूपी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निधी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी इच्छुक धार्मिक संस्थांकडून ऑनलाइन पोर्टलद्वारे अर्ज मागवण्यात आले होते. त्यानुसार २२४ अर्ज ऑनलाइन, तर १२ अर्ज ऑफलाइन पद्धतीने प्राप्त झाले आहेत. यामध्ये नाशिक शहर, जिल्ह्यातील अन्य भाग तसेच जिल्हाबाहेरील संस्थांचाही समावेश आहे.

शहरातून ८९ अर्ज

नाशिक शहरातून ८६ ऑनलाइन आणि तीन ऑफलाइन असे ८९ अर्ज प्राप्त झाले आहेत. शहराबाहेरील, मात्र नाशिक जिल्ह्यातील भागांतून ११४ ऑनलाइन आणि आठ ऑफलाइन असे १२२ अर्ज आले आहेत.

जिल्हाबाहेरील भागांतून २४ ऑनलाइन आणि एक ऑफलाइन अर्ज प्राप्त झाला आहे. अर्जांची छाननी आणि पात्रतेची पडताळणी पूर्ण झाल्यानंतरच संबंधित संस्थांना निधी किंवा सुविधा मंजूर करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे पात्र धार्मिक संस्थांना कोणत्या सुविधा मिळणार, याकडे लक्ष लागले आहे.

ऑफलाइन अर्जांचीही तपासणी

ऑफलाइन अर्जांची ऑनलाइन नोंदणी करताना तांत्रिक अडचणी आल्याने काही अर्ज पोर्टलवर नोंदवले जाऊ शकले नाहीत. त्यामुळे अशा अर्जांचीही तपासणी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना महापालिकेला देण्यात आल्या आहेत.

प्राधिकरणाचे पत्र प्राप्त झाल्यानंतर लेखा व वित्त विभागाने अर्जाची छाननी करून पुढील तपासणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे प्रस्ताव पाठवले आहेत. नियमानुसार पुढील कार्यवाही करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT