Ramayan Theme Park 
नाशिक

Ramayan Theme Park | 'रामायण थीम पार्क' अन् प्राणिसंग्रहालय उभारणार

Ramayan Theme Park | सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर मनपाच्या नव्या संकल्पना

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील पर्यटन आणि धार्मिक आकर्षण वाढविण्याच्या उद्देशाने नाशिक महापालिकेने दोन महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्याची तयारी सुरू केली आहे.

आडगाव परिसरात रामायणकालीन घटनांवर आधारित रामायण थीम पार्क उभारण्याबरोबरच बंद पडलेल्या बॉटॅनिकल गार्डनच्या जागेवर प्राणिसंग्रहालय विकसित करण्याची संकल्पना पुढे आली आहे. या दोन्ही प्रकल्पांसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम सुरू असून, शासनाकडून निधी उपलब्ध करून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

महापालिकेच्या नियोजनानुसार आडगाव येथील सुमारे दहा एकर जागेवर 'रामायण थीम पार्क' साकारण्यात येणार आहे. या प्रकल्पामध्ये प्रभू श्रीरामांच्या जीवनातील विविध प्रसंगांवर आधारित, रामायणकालीन संस्कृती आणि धार्मिक वारसा आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सादर करण्याची संकल्पना आहे.

सिंहस्थासाठी येणाऱ्या देश-विदेशातील भाविकांना आकर्षित करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जात आहे. दुसरीकडे, पूर्वी विकसित करण्यात आलेले परंतु सध्या बंद अवस्थेत असलेले बॉटॅनिकल गार्डन आणि 'बोलकी झाडे' प्रकल्पाच्या जागेवर आधुनिक सुविधांनी सुसज्ज प्राणिसंग्रहालय उभारण्याचाही प्रस्ताव विचाराधीन आहे.

शहरातील पर्यावरण पर्यटनाला चालना देण्याबरोबरच विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक केंद्र म्हणूनही हा प्रकल्प विकसित करण्याचा विचार आहे.

पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष नको

अद्याप या दोन्ही प्रकल्पांना अंतिम प्रशासकीय मान्यता मिळालेली नसून, सविस्तर प्रकल्प अहवाल आणि निधी उपलब्धतेनंतर पुढील कारवाई केली जाणार आहे. परंतु यापूर्वी उभारण्यात आलेले अ‍ॅम्युझमेंट पार्क, वॉटर पार्क, मत्स्यालय, बॉटॅनिकल गार्डन, मनोरंजन पार्क, बोटिंग क्लब आदी अनेक प्रकल्प कालांतराने देखभालीअभावी बंद पडले किंवा खासगी संस्थांकडे सोपवावे लागले.

त्यामुळे नव्या प्रकल्पांपेक्षा विद्यमान सुविधांचे जतन आणि शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, जलनिस्सारण व इतर मूलभूत सुविधांवर प्राधान्याने खर्च करावा, अशी मागणी नागरिकांकडून व्यक्त होत आहे. महापालिकेचा प्रयत्न शासनाच्या कुंभमेळा निधीतून या दोन्ही प्रकल्पांसाठी आर्थिक तरतूद मिळवण्याचा आहे. आवश्यक निधी उपलब्ध न झाल्यास महापालिकेच्या निधीतूनही हे प्रकल्प उभारण्याचा पर्याय विचारात असल्याची माहिती सूत्रांनी दिली

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT