Nashik Municipal Corporation Election / नाशिक महानगरपालिका निवडणूक Pudhari News Network
नाशिक

Nashik Municipal Corporation | नाशिक महापालिकेत महायुतीची सत्ता

Nashik Municipal Corporation | शिवसेना, राष्ट्रवादीच्या सत्तेत सहभागाचा प्रस्ताव भाजपकडून प्रदेशकडे सादर

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिक महापालिकेत १२२ पैकी सर्वाधिक ७२ जागा मिळवत सत्ता स्थापनेचा जादुई आकडा भाजपने एकहाती पार केला असला तरी महापालिकेत एकट्या भाजपची नव्हे तर, महायुतीची सत्ता स्थापन होणार आहे.

नाशिक महापालिकेत शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या दोन्ही पक्षांनी युती करत भाजपविरोधात निवडणूक लढविली असली तरी केंद्र व राज्यातील महायुती सरकारच्या धर्तीवर नाशिक महापालिकेतही शिवसेना-राष्ट्रवादीला सत्तेस सामील करून घेण्याचा निर्णय भाजपने घेतला असून, तसा प्रस्ताव भाजपच्या स्थानिक नेत्यांनी प्रदेश कार्यालयाकडे पाठविला आहे.

मुंबई, ठाण्यातील सत्ता स्थापनेच्या तडजोडीतून या दोन्ही पक्षांना भाजपने सत्तेत सामील करून घेण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. केंद्र व राज्याच्या धर्तीवर नाशिक महापालिकेची निवडणूकदेखील महायुतीद्वारे लढविण्याची भूमिका शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी (अजित पवार) गटाने घेतली होती. परंतु भाजपने स्वबळावर निवडणूक लढवत मित्र पक्षांना बाजूला ठेवले. अखेर शिवसेना (शिदे गट) व राष्ट्रवादी (अजित पवार गटा) ने युती करत भाजपविरोधात निवडणूक लढविली.

या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक ७२ जागांवर विजय मिळवत नाशिक महापालिकेची सत्ता सलग दुसऱ्यांदा एकहाती काबीज केली आहे. निवडणूक निकालानंतर महापालिकेतील सत्तेचे चित्र पुरेसे स्पष्ट झाले असताना आणि महापौर भाजपचाच होणार यावर शिक्कामोर्तब झाले असताना भाजपला महापालिकेत सत्तास्थापन करताना केंद्र व राज्याच्या सत्तेतील मित्रपक्षांची आठवण झाली आहे.

भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार यांनी शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी (अजित पवार गट) च्या स्थानिक नेत्यांची बैठक घेत त्यांना सत्तेत सहभागी होण्याचे निमंत्रण दिले. या नेत्यांच्या तब्बल चार वेळा बैठका झाल्यानंतर शिवसेना-राष्ट्रवादीने भाजपसमवेत सत्तेत सहभागी होण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर भाजपच्या स्थानिक नेत्यांनी महापालिकेत शिवसेना-राष्ट्रवादीला सोबत घेत सत्ता स्थापन करण्याचा प्रस्ताव प्रदेश कार्यालयाकडे पाठविला आहे. शहराध्यक्ष सुनील केदार यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे

मुंबई, ठाण्यासाठी तडजोड

नाशिक महापालिकेत भाजपकडे बहुमत असूनदेखील सत्तेत शिवसेना (शिदे गट) व राष्ट्रवादी (अजित पवार गटा) ला सत्तेत सहभागी करून घेण्यामागे मुंबई, ठाणे आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेतील सत्तास्थापनेची तडजोड असल्याची चर्चा आहे. नाशिकमध्ये शिवसेनेला सोबत घेऊन मुंबईच्या महापौरपदाला गवसणी घालण्याची खेळी भाजपकडून खेळली जात असल्याचे बोलले जाते.

नाशिक महापालिकेत भाजप, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आम्ही एकत्र काम करावे, असे आमचे मत आहे. राज्यात व केंद्रात आम्ही तिन्ही पक्ष सत्तेत एकत्र आहोत. त्यामुळे नाशिक महापलिकेतसुद्धा महायुती म्हणून एकत्र काम करावे, असे आम्हाला वाटते.
- सुनील केदार, शहराध्यक्ष, भाज

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT