नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरातील नळकनेक्शनचे खासगी मक्तेदारामार्फत करण्यात आलेल्या सर्वेक्षणानंतर नाशिक महापालिकेने नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नळकनेक्शनधारकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. जलमापक नसलेल्या अथवा सदोष जलमापक असलेल्या सुमारे तीन हजार नळ कनेक्शनधारकांना महापालिकेने नोटीसा बजावल्या आहेत.
१५ दिवसांत जलमापक दुरुस्त करून घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मुदतीत कारवाई न केल्यास दंडासह दुप्पट पाणीपट्टी वसूल करण्याचा इशारा देण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात पाऊण इंचापेक्षा अधिक आकाराच्या नळकनेक्शनवर ही कारवाई केली जात आहे.
पाणीपुरवठा व्यवस्थेवर होणारा खर्च आणि पाणीपट्टीतून मिळणाऱ्या महसुलात मोठी तफावत आहे. परिणामी, महापालिकेला पाणीपुरवठा व्यवस्थेतून दरवर्षी सुमारे ४५ ते ५० कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. सुमारे नऊ वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या सर्वेक्षणात शहरातील ४४ टक्के पाणीवापर 'हिशेबाबाह्य' असल्याचे समोर आले होते. त्यामुळे पाणीगळती आणि पाणीचोरीच्या प्रश्नावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
महापालिकेकडे पाणीपट्टीची देयके वितरित करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ नसल्याने पाणीपट्टीची थकबाकी तब्बल ३०० कोटी रुपयांवर पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर पाणीपट्टीची देयके वितरित करण्याबरोबरच अनधिकृत नळकनेक्शन शोधण्यासाठी महापालिकेने पुण्यातील 'क्रॅनबेरी' या खासगी मक्तेदार कंपनीची नियुक्ती केली होती.
या कंपनीमार्फत शहरातील नळकनेक्शनचे सर्वेक्षण करण्यात आले असून, त्याचा अहवाल महापालिकेच्या करवसुली विभागाकडे सादर करण्यात आला आहे.
सर्वेक्षणात महापालिकेच्या नोंदीनुसार असलेल्या २ लाख ४० हजार १७० नळकनेक्शनची तपासणी करण्यात आली. त्यापैकी केवळ ७४ हजार ४६३ नळकनेक्शनवरील जलमापक नियमानुसार सुस्थितीत असल्याचे आढळले. तब्बल १ लाख ६५ हजार ७०७ नळ कनेक्शनमध्ये विविध प्रकारच्या त्रुटी अथवा नियमांचे उल्लंघन आढळून आले.
पहिल्या टप्प्यात जलमापक नसलेल्या किंवा सदोष जलमापक असलेल्या कनेक्शनधारकांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. संबंधितांनी विहित मुदतीत दुरुस्ती न केल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. पाणीपट्टीची दुप्पट आकारणी केली जाऊ शकते. दंडाची रक्कम न भरल्यास संबंधित नळकनेक्शन बंद करण्याची कारवाईही केली जाणार आहे.
नोंद असलेले कनेक्शन: २,४०,१७०
जलमापक सुस्थितीत: ७४,४६३
रीडिंग दिसत नसलेले जलमापक: २९,४५७
जमिनीखाली बसविलेले जलमापक: २०,९४६
बंद स्थितीतील: २०,१५४
जलमापक नसलेले कनेक्शन: १५,९६७
फोटो घेता न आलेले कनेक्शन: १२,५२६
घर बंद असल्याने तपासणी न झालेले: १८,५७८
अवजड चेंबरखालील जलमापक: ४,९२३
नळजोडणी खंडित असलेले: २,२०७
मीटर चोरीला गेलेले: १,४३७
रिवाइज जलमापक: ३६७
तात्पुरते बंद स्थितीतील कनेक्शन: २,१६५
प्रतिसाद न मिळालेले कनेक्शन: ३७,०००