नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महापालिकेतील राजसारथी टीडीआर प्रकरण, म्हाडा नियमभंग आणि जनसंपर्क विभागातील जाहिरात खर्चातील कथित अनियमितता या तीन महत्त्वाच्या प्रकरणांच्या चौकशीसाठी स्थायी समितीने समित्या जाहीर करून १५ दिवस उलटले आहेत. मात्र, अद्याप या चौकशी समित्यांना प्रत्यक्ष कामकाज सुरू करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण झालेली नसल्याने चौकशीचा मुहूर्तच लाभलेला नाही.
चार वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर महापालिकेत लोकप्रतिनिधींची सत्ता आल्यानंतर मागील काळातील विविध निर्णय आणि कथित अनियमिततेची चौकशी करण्यावर भर दिला जात आहे. याच पार्श्वभूमीवर १६ जुलै रोजी स्थायी समितीचे सभापती मच्छिंद्र सानप यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत तीन स्वतंत्र चौकशी समित्यांची घोषणा करण्यात आली होती.
जनसंपर्क विभागामार्फत वृत्तपत्र जाहिरातींसाठी मंजूर करण्यात आलेल्या दोन कोटी रुपयांच्या निविदेचा खर्च तब्बल सात कोटी रुपयांपर्यंत वाढल्याचा आरोप बैठकीत करण्यात आला होता. या प्रकरणाच्या चौकशीसाठी अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, मुख्य लेखाधिकारी दत्तात्रय पाथरुट आणि प्रशासन उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर यांची समिती जाहीर करण्यात आली.
या चौकशीसंदर्भातील ठराव प्रशासनाकडे पोहोचला असला तरी प्रत्यक्ष चौकशीला अद्याप गती मिळालेली नाही. याशिवाय, इंदिरानगर येथील श्री राजसारथी सहकारी गृहनिर्माण संस्थेला डीपी रस्त्याच्या भूसंपादनाच्या मोबदल्यात देण्यात आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या टीडीआर व्यवहाराची चौकशी अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय समितीकडून करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र या प्रकरणाचा अधिकृत ठराव अद्याप प्रशासनाकडे पोहोचलेला नसल्याचे समोर आले आहे.
तसेच, वकीलवाडी आणि सिडकोतील उंटवाडी येथील दोन मोठ्या बांधकाम प्रकल्पांमध्ये म्हाडाच्या २० टक्के घरांच्या नियमाचे पालन न झाल्याचा मुद्दाही स्थायी समितीत उपस्थित झाला होता. या प्रकरणाच्या चौकशीसाठी अतिरिक्त आयुक्त अमित रंजन यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, या चौकशीचाही ठराव प्रशासनाला प्राप्त न झाल्याने कारवाई सुरू होऊ शकलेली नाही.
"जाहिरात विभागातील अनियमिततेच्या चौकशीचा ठराव प्रशासनाकडे पाठविण्यात आला आहे. राजसारथी प्रकरणाचा ठरावही लवकरच दिला जाईल. तसेच सिडकोतील म्हाडा प्रकरणावर स्थायी समितीत पुन्हा चर्चा करण्यात येणार आहे."— मच्छिंद्र सानप, सभापती, स्थायी समिती