नाशिक : महापालिकेच्या 31 प्रभागांतील 122 जागांच्या निवडणुकीसाठी शहरात 9 ठिकाणी 10 मतमोजणी केंद्रे उभारली जाणार आहेत. सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरू झाल्यानंतर पहिल्या दोन तासांतच अर्थात दुपारी 12 पर्यंत महापालिकेचे कारभारी कोण याचा फैसला मतदान यंत्रातून बाहेर येणार आहे.
महापालिका निवडणुकीसाठी येत्या 15 जानेवारीला मतदान होत आहे. दुसऱ्याच दिवशी 16 जानेवारीला मतमोजणीद्वारे निकाल जाहीर केला जाईल. राजकीय पक्षांची नेतेमंडळी, उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी घरभेटी, प्रचारफेऱ्या, चौकसभा, जाहीर सभांच्या माध्यमातून या निवडणुकीचे रण पेटविलेले असताना प्रशासकीय पातळीवरही निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे.
मतदान आणि मतमोजणीसाठी तब्बल 10 हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांची फौज तैनात केली जाणार आहे. यासाठी सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना नियुक्तिपत्रे प्रदान करण्यात आली आहेत. मतदान आणि मतमोजणी कामाचे प्रशिक्षणही देण्यात येत आहे. या निवडणुकीसाठी शहरात विविध ठिकाणी तब्बल 1,563 मतदान केंद्रांची उभारणी केली जाणार असून, 1,563 कंट्रोल युनिट व 4,650 बॅलेट युनिटची व्यवस्था केली जाणार आहे.
मतदानानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी 16 जानेवारीला मतमोजणीद्वारे निवडणुकीचा निकाल घोषित केला जाणार आहे. यासाठी 9 ठिकाणी 10 मतमोजणी केंद्रे उभारली जाणार आहेत. या मतमोजणीसाठी 400 अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रभागनिहाय मतमोजणी केंद्रे
प्रभाग क्र. मतमोजणीचे ठिकाण
1, 2, 3 - मीनाताई ठाकरे स्टेडियम, पंचवटी
4, 5, 6 - मीनाताई ठाकरे स्टेडियम, पंचवटी
7, 12, 24 - दादासाहेब गायकवाड सभागृह, मुंबई नाका
13, 14, 15 - वंदे मातरम् सभागृह, डीजीपीनगर, नाशिक
16, 23, 30 - अटल दिव्यांग स्वाभिमान भवन, मुंबई नाका
17, 18, 19 - शासकीय तंत्रनिकेतन, सामनगाव रोड, नाशिक
20, 21, 22 - नाशिकरोड विभागीय कार्यालय, नाशिकरोड
25, 26, 28 - प्रबोधनकार ठाकरे सभागृह, अंबड पोलिस ठाणे मार्ग, सिडको
27, 29, 31 - राजे संभाजी स्टेडियम, सिडको
8, 9, 10, 11 - सातपूर क्लब हाउस, सातपूर